Skip to content

खासदार अशोक चव्हाणांसह चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी; व्यापाऱ्याकडे मागितली एक लाखांची खंडणी

नांदेडमधील खळबळजनक प्रकार; मुंबईतील पेडर रोडवरून संशयित आरोपीला अटक

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

खासदार अशोक चव्हाण
खासदार अशोक चव्हाण

नांदेड : खासदार अशोक चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना एकाच दिवशी जीवे मारण्याचा कट रचल्याची धमकी देत एका व्यापाऱ्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. रवी उर्फ रवींद्र गौतम रोकडे (वय ३९, मूळ रा. आष्टी, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील व्यापारी महेश कृष्णाजी तुतारे आणि रवी रोकडे यांची पूर्वीपासून ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून रोकडे हा तुतारे यांना फोन करून पैशांची मागणी करत होता. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देत होता. १४ नोव्हेंबर रोजी तुतारे घरी असताना रोकडेने त्यांना फोन करून थेट एक लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र, तुतारे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली.

तक्रारीनुसार, तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे खासदार अशोक चव्हाण यांच्यासह नांदेडमधील चार आमदारांना एकाच दिवशी संपवण्याचा कट आखल्याचा दावा रोकडेने केला. तसेच, आपल्या पाठीशी मोठ्या लोकांचा हात असून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आपले कोणीही काही बिघडवू शकत नाही, असे सांगत एक लाख रुपये न दिल्यास आयुष्यभर लक्षात ठेवशील, अशी धमकी त्याने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मुंबईतून पोलिसांनी घेतले ताब्यात

या धमकीनंतर महेश तुतारे यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित रोकडे मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पेडर रोड परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी संशयिताला वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे. दरम्यान, धमकीमध्ये उल्लेख केलेले चार आमदार नेमके कोण आहेत? तसेच तीन वर्षांपूर्वी खरोखरच असा काही कट आखण्यात आला होता की केवळ खंडणीसाठी ही धमकी देण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror