Pune News : सततचा थकवा, चिडचिडीकडे दुर्लक्ष नको; बी१२ची कमतरता असू शकते ; आहारातील असंतुलन, मधुमेहावरील औषधांचा दीर्घकाळ वापर ठरू शकतो कारणीभूत
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : सततचा थकवा, चिडचिड, मनःस्थितीतील बदल, नैराश्याची लक्षणे आणि एकाग्रतेचा अभाव यांकडे अनेकदा मानसिक ताण म्हणून पाहिले जाते.
1 min read

स्मिता कुलकर्णी

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : सततचा थकवा, चिडचिड, मनःस्थितीतील बदल, नैराश्याची लक्षणे आणि एकाग्रतेचा अभाव यांकडे अनेकदा मानसिक ताण म्हणून पाहिले जाते. मात्र, या लक्षणांमागे शरीरातील व्हिटॅमिन बी१२ची कमतरताही असू शकते. रक्तपेशींची निर्मिती, मेंदूचे कार्य आणि मज्जासंस्थेचे आरोग्य टिकवण्यासाठी बी१२ महत्त्वाचे असल्याने अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.https://maharashtramirror.com/ Pune News
असंतुलित आहारामुळे धोका
वजन कमी करण्यासाठी मर्यादित किंवा असंतुलित आहार घेणाऱ्यांमध्ये बी१२सह आवश्यक पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. शाकाहारी व्यक्तींना आहारातून पुरेसे बी१२ मिळवणे तुलनेने कठीण असते. मात्र, मांसाहार करणाऱ्यांनाही ही कमतरता जाणवू शकते. पचनसंस्थेचे विकार, काही शस्त्रक्रिया, वाढते वय आणि विशिष्ट औषधांचा दीर्घकाळ वापर यांमुळेही शरीरातील बी१२चे शोषण कमी होऊ शकते.
मधुमेही रुग्णांनी घ्यावी काळजी
मधुमेहावरील मेटफॉर्मिन या औषधाचा दीर्घकाळ वापर केल्याने काही व्यक्तींमध्ये बी१२ची पातळी घटू शकते. परिणामी हात-पायांना मुंग्या येणे, बधिरपणा आणि मज्जासंस्थेशी संबंधित त्रास उद्भवू शकतात. बी१२च्या कमतरतेमुळे रक्तातील होमोसिस्टीनचे प्रमाणही वाढू शकते, ज्याचा हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्याशी संबंध आहे.
योग्य आहार, तपासणी आवश्यक
बी१२ची पातळी टिकवण्यासाठी आहारात दूध, दही, पनीर, अंडी, मासे आणि मांस यांचा समावेश करता येतो. लक्षणे जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासणी करून घ्यावी. कमतरता आढळल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार पूरक औषधे घ्यावीत. केवळ आहारात बदल करण्याऐवजी कमतरतेचे मूळ कारण शोधून योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
बी१२ जीवनसत्त्वासाठी आहारात काय घ्यावे?
दूध, दही, ताक आणि पनीर – नियमित प्रमाणात आहारात समाविष्ट करा.
अंडी, मासे, चिकन आणि मांस – मांसाहारी व्यक्तींसाठी बी१२ जीवनसत्त्वाचे नैसर्गिक स्रोत.
बी१२ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ – बी१२ जीवनसत्त्व अतिरिक्त स्वरूपात मिसळलेले धान्य, वनस्पतीजन्य दूध आणि इतर पदार्थ आहारात घेता येतात.
पारंपरिक आंबवलेले पदार्थ – मिलेटची (भरडधान्यांची) आंबील आणि इतर आंबवलेले पदार्थ आहारात समाविष्ट करता येतात. आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे काही पोषक घटकांची उपलब्धता आणि पचनक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र, अशा पदार्थांमधून पुरेशा प्रमाणात बी१२ जीवनसत्त्व मिळतेच असे नाही.
डाॅ. अर्चना रायरीकर सल्लागार आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञ
न्यूट्रिसत्त्व


