छत्रपती संभाजी महाराजांच्या दहा फुटी कांस्य शिल्पाचे अनावरण
छत्रपती संभाजी महाराज उद्यानात 'बुधभूषण' ग्रंथरचनाकारांचे जगातील पहिले १० फूट उंचीचे पूर्णाकृती कांस्य शिल्प
2 min read

छत्रपती संभाजी महाराज उद्यानात 'बुधभूषण' ग्रंथरचनाकारांचे जगातील पहिले १० फूट उंचीचे पूर्णाकृती कांस्य शिल्प
निलेश राऊत
पुणे: छत्रपती संभाजी महाराज उद्यानात महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. १७) दुपारी करण्यात आले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार डॉ. नीलम गोन्हें, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेता गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांचे विश्वातील हे पहिले १० फूट उंचीचे पूर्णाकृती कांस्य शिल्प आहे. या शिल्पाच्या भोवती रंगीत कारंजे , तसेच परिसरात शोभिवंत फूलझाडे लावण्यासह विद्युत रोषणाई केलेली आहे.
प्रकल्पास एकूण पाच कोटी रुपये खर्च झाला आहे. 'बुधभूषण' ग्रंथातील श्लोक निवडण्याकरिता इतिहास तज्ज्ञ, संस्कृत मराठी भाषा तज्ज्ञ, अभ्यासक यांची इतिहास तज्ज्ञ समिती स्थापन केलेली होती. या समितीमार्फत छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या संस्कृत 'बुधभूषण' ग्रंथामधून आवश्यक श्लोक निवडण्यात आले आहेत.
पूर्णाकृती पुतळा व महाराजांनी रचलेल्याले नऊ निवडक श्लोक मराठी व इंग्रजी अर्थासह तसेच बुधभूषण ग्रंथाची संक्षिप्त माहिती देणाऱ्या प्रस्तावनेसह कोरण्यात आली आहे. याकरिता भव्य १० दगडी भिंती उभारण्यात आलेल्या आहेत. शिल्पाच्या भोवती रंगीत कारंजे, तसेच परिसरात शोभिवंत फूलझाडे लावण्यासह विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
अतिशय कठीण कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व जगासमोर आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने हे दैदीप्यमान शिल्प उभारण्यात आले आहे. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे.
नाटककार गडकरिंचा पुतळा हटवला
संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा ३ जानेवारी २०१७ रोजी मध्यरात्री संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवून मुठा नदीत फेकून दिला होता. गडकरींच्या 'राजसंन्यास' या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत हे कृत्य करण्यात आले होते.
हा पुतळा २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते बसवण्यात आला होता. मात्र हा पुतळा हटविल्यावर तो पुन्हा त्याच ठिकाणी बसवण्यावरून मोठा राजकीय व सामाजिक वाद निर्माण झाला होता. काही संघटनांनी या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांचाच पुतळा बसवण्याची मागणी केली होती परंतु त्यावेळी पुणे महापालिकेने हा वाद टाळण्यासाठी त्याच उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला होता.


