Skip to content

Uddhav Thackeray:"शिवसेना भवनातून आता रोजगाराची क्रांती!"; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, मराठी तरुणांसाठी 'लॉजिस्टिक' प्रशिक्षण वर्गांचा शुभारंभ

Shivsena Uddhav Thackeray Latest News : बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य; केवळ आंदोलनेच नाही, तर आता विमानतळ आणि बंदरांवर नोकरीची हमी देणारे कुशल तरुण घडवणार

V
Vivek

2 min read

Uddhav Thackeray

Shivsena Uddhav Thackeray Latest News : बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य; केवळ आंदोलनेच नाही, तर आता विमानतळ आणि बंदरांवर नोकरीची हमी देणारे कुशल तरुण घडवणार

मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मराठी तरुणांच्या रोजगारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. "शिवसेनेने आजवर केवळ आंदोलने केली नाहीत, तर मराठी माणसांसाठी रोजगाराचे दरवाजेही उघडले आहेत. आता बदलत्या काळानुसार एक्सपोर्ट-इम्पोर्ट आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मराठी तरुणांना स्थान मिळवून देण्यासाठी शिवसेना भवनातून विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करत आहोत," अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

"आंदोलनासोबतच प्रशिक्षणाची जोड"

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 'नोकरी आणि रोजगार' या मूळ अजेंड्यावर भाष्य केले. ते म्हणाले,

"अनेक क्षेत्रांत मराठी माणसांना प्रवेश नाकारला जात होता, तेव्हा शिवसेनेने आंदोलने केली. पण केवळ आंदोलने करून चालत नाही, तर त्याठिकाणी कामासाठी कुशल तरुणही लागतात. म्हणूनच, पात्रतेप्रमाणे शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. 23 जानेवारीपासून सुरू झालेल्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात भूमिपुत्रांसाठी हे आमचे पुढचे पाऊल आहे."

लॉजिस्टिक आणि पोर्ट क्षेत्रात संधीची लाट

सध्याच्या जागतिक बाजारपेठेचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले की, "आजचा जमाना वेगाने पुढे जात आहे. महाराष्ट्रात नवी बंदरे (पोर्ट्स) आणि विमानतळे (एअरपोर्ट्स) येत आहेत. याठिकाणी लॉजिस्टिक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. आपल्या मुला-मुलींनी ही संधी गमावता कामा नये, यासाठी आम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्ग सुरू करत आहोत."

प्रशिक्षणाचे स्वरूप आणि रोजगाराची हमी

कौशल्य विकास: 30 विद्यार्थ्यांची पहिली बॅच शिवसेना भवनातून सुरू केली जात आहे.

प्रात्यक्षिक अनुभव: विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष विमानतळ आणि बंदरांच्या ठिकाणी नेऊन कामाचे स्वरूप दाखवले जाईल.

सर्टिफिकेट आणि नोकरी: प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल आणि त्यांना तत्काळ नोकरी मिळेल, अशी पात्रतेची तयारी करून घेतली जाईल.

राज्यभर विस्तार: ही संकल्पना सध्या मुंबईत सुरू होत असली, तरी भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रभर असे वर्ग सुरू करण्याची इच्छा ठाकरेंनी व्यक्त केली.

तज्ज्ञांचे मत: "संधी भरपूर, फक्त ज्ञानाची गरज"

या उपक्रमात सहभागी असलेले उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ शंतनू भडकंमकर यांनी सांगितले की, "आमच्या उद्योगांमध्ये सध्या कुशल माणसांची खूप गरज आहे. लॉजिस्टिक क्षेत्रात संधी भरपूर आहेत, पण योग्य ज्ञान असलेल्या तरुणांची कमतरता आहे. शिवसेना भवनातून उपलब्ध करून दिलेली ही संधी मराठी तरुणांसाठी गेमचेंजर ठरेल."

Share