Uddhav Thackeray : 'मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प'; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर घणाघात
Uddhav Thackeray On Maharashtra Sarkar : शेतकऱ्यांचा 'सातबारा कोरा' करण्याचे आश्वासन कुठे गेले?
2 min read

Uddhav Thackeray On Maharashtra Sarkar : शेतकऱ्यांचा 'सातबारा कोरा' करण्याचे आश्वासन कुठे गेले? ; उद्धव ठाकरे
मुंबई :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ 'कर्ज काढून फटाके वाजवणारा' आणि सर्वसामान्यांना मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हणत त्यांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे.
निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांचा 'सातबारा कोरा' करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र या अर्थसंकल्पात केवळ अटी आणि नियमांचे जाळे टाकून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आपल्या कार्यकाळातील कर्जमाफीची आठवण करून देताना ते म्हणाले की, "आम्ही कोणतीही अट न घालता दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली होती, मात्र सध्याच्या सरकारने त्यात अनेक पेच निर्माण केले आहेत."
'लाडकी बहीण' आणि २१०० रुपयांच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत अर्थसंकल्पात स्पष्टता नसल्याचे ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले. महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात या रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अर्थसंकल्पात का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही केवळ एक राजकीय जुमलेबाजी असल्याची टीका त्यांनी केली.
कंत्राटदारांचे लाड आणि सामान्यांकडे दुर्लक्ष
अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधांच्या तरतुदींवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, "हा अर्थसंकल्प केवळ कंत्राटदारांसाठी ठोस योजना घेऊन आला आहे, मात्र शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या पदरात काहीही पडलेले नाही." बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी उपरोधिक सवाल केला की, "मुंबईचा सामान्य नागरिक अहमदाबादला जाऊन नेमके काय करणार आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे."
३०० कोटी वृक्ष लागवडीवर साशंकता
सरकारने जाहीर केलेल्या ३०० कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एवढे वृक्ष लावणार कुठे आणि त्यासाठीची जमीन नेमकी कोणती? तसेच या जमिनीवर काही विशेष आरक्षण आणून ते कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे का? अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
'कर्ज काढून दिवाळी' - आर्थिक स्थितीवर चिंता
राज्यावर असलेला कर्जाचा डोंगर पाहता, हा अर्थसंकल्प म्हणजे 'कर्ज काढून फटाके वाजवल्यासारखे' असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. अर्थसंकल्पात वारंवार '२०४७' चा उल्लेख केला जात आहे, मात्र सध्याची कर्जमाफी पूर्ण करण्यासाठी सरकारला इतकी वर्षे लागणार आहेत का? असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


