Pune News : टोमॅटो मातीमोल; उत्पादन खर्चही निघेना
Pune News : पुणे: राज्यासह परराज्यांतही टोमॅटोचे पीक एकाच वेळी काढणीला आल्याने बाजारात मालाचा उठाव कमी झाला आहे.
1 min read

Pune News : पुणे: राज्यासह परराज्यांतही टोमॅटोचे पीक एकाच वेळी काढणीला आल्याने बाजारात मालाचा उठाव कमी झाला आहे. परिणामी, मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटोचे दर घसरले असून, दर्जानुसार किलोला अवघे ८ ते १० रुपये भाव मिळत आहेत. उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. टोमॅटोला कवडीमोल दर मिळत आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री किलोला २० ते २५ रुपये दराने होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पुण्यातील तरकारी घाऊक बाजारात पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक होत आहे. ही आवक नेहमीप्रमाणे असली, तरी स्थानिक बाजारपेठेसह राज्याबाहेरूनही मागणी घटली आहे.
दर घसरल्याने हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ चालकांकडून टोमॅटोची खरेदी वाढली आहे. मात्र, घरगुती ग्राहकांची मागणी नेहमीप्रमाणेच असल्याचे ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले.
पुढील २० ते २५ दिवस दर कमीच राहण्याची शक्यता
“राज्यासह परराज्यांत एकाच वेळी टोमॅटो काढणीला आल्याने आवकेच्या तुलनेत उठाव कमी आहे. पुढील २० ते २५ दिवस हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे,” असे श्री शारदा गजानन आडते असोसिएशनचे अध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले.


