Mumbai News : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आणखी तिघांना अटक ; सोनीपत येथून समीर, जतिन आणि अंकित खटक पोलिसांच्या ताब्यात
Mumbai News : मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या मोटारीवर जुहू परिसरात झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने हरियाणातील सोनीपत येथून समीर, जतिन आणि अंकित खटक या तिघांना अटक केली आहे.
2 min read

शस्त्रपुरवठा आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू
Mumbai News : मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या मोटारीवर जुहू परिसरात झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने हरियाणातील सोनीपत येथून समीर, जतिन आणि अंकित खटक या तिघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे. हल्लेखोरांना शस्त्रे कोणी पुरवली, त्यांना आर्थिक व अन्य मदत कोणी केली आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
जुहू येथे १८ ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या मोटारीवर गोळीबार केला होता. या घटनेत श्रॉफचा वाहनचालक जखमी झाला होता. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेने राजस्थानमधील कोटा येथून गोळीबारात कथित सहभाग असलेल्या फुलसिंग, रेहान अन्सारी आणि रितिक महतो उर्फ रोशन या तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
समीरची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
तपासात समीरची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्याने कथित सूत्रधार अनिल पंडित आणि गोळीबारातील संशयित रेहान अन्सारी यांच्यात संपर्क घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. समीरने हल्लेखोरांच्या निवासाची व्यवस्था केली होती का, त्यांना अन्य मदत पुरवली होती का, तसेच शस्त्रांची उपलब्धता आणि आर्थिक व्यवहारांमध्ये त्याचा सहभाग होता का, याची चौकशी सुरू आहे. जतिन आणि अंकित खटक यांचीही कथित भूमिकाही तपासली जात आहे.
अमृतसरहून रेल्वेने पिस्तूल, काडतुसे मुंबईत
या प्रकरणात यापूर्वी दिल्ली आणि हरियाणा येथून चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये कुणाल, सुमित आणि राधा व बाबिता या दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शस्त्रे मिळवणे आणि ती मुंबईत आणणे यासाठी या आरोपींनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या होत्या.
अमृतसर येथून पिस्तूल आणि काडतुसे मिळवण्यात आली, त्यानंतर ती रेल्वेने मुंबईत आणून पुढे पोहोचवण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेली देशी बनावटीची दोन शस्त्रे अद्याप पोलिसांना मिळालेली नाहीत. तसेच, गुन्ह्यात वापरलेले मोबाइल फोन नष्ट केल्याचा संशयही आरोपींवर आहे. त्यामुळे आरोपींमधील संदेशवहन, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची तपासणी केली जात आहे.
दोन लाख रुपयांच्या व्यवहारांची पडताळणी
हल्लेखोर आणि त्यांना मदत करणाऱ्यांना मिळून सुमारे दोन लाख रुपये मिळाल्याचा पोलिसांना संशय आहे. या रकमेतून काही पैसे दुचाकी खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच, रेहान अन्सारीच्या बँक खात्यात ३७ हजार रुपये जमा झाल्याची माहितीही समोर आली आहे. या व्यवहारांचा गोळीबाराच्या कटाशी संबंध आहे का, तसेच अन्य कोणाकडून आर्थिक मदत करण्यात आली होती का, याची पडताळणी सुरू आहे.
शुभम लोणकरचे नावही तपासात
या प्रकरणाच्या तपासात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या शुभम लोणकरचे नावही पुढे आले आहे. त्याची कथित भूमिका आणि अनिल पंडित याच्याशी असलेले संबंध तपासले जात आहेत. आरोपींनी केवळ टायगर श्रॉफलाच लक्ष्य केले होते की अन्य चित्रपट कलाकारांच्या हालचालींचीही पाहणी केली होती, याचाही तपास सुरू आहे. गोळीबाराचे नियोजन, शस्त्रांचा पुरवठा, आर्थिक मदत आणि या कटात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्यावर गुन्हे शाखेचा भर आहे.


