महापौर बंगल्यातील झाडे तोडल्याचा अहवाल नाहीच
एक महिना झाला तरीही कार्यवाही नाही; घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून चालढकल
1 min read

एक महिना झाला तरीही कार्यवाही नाही; घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून चालढकल
निलेश राऊत
पुणे: महापौर बंगल्यातील १९ झाडांच्या कत्तल प्रकरणाचा चौकशी अहवाल अद्यापही घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून देण्यात आलेला नाही. मुदत उलटून गेली तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो मागितलाही नाही आणि पर्यायाने पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

घोले रस्त्यावर क्षेत्रीय कार्यालयालगत असलेला महापौर बंगला हा गेली चार वर्ष महापालिकेत सभासद नसल्याने कुलूप बंद होता. निवडणूक होऊन सभागृह अस्तित्वात आल्याने या बंगल्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. महापौर मंजूषा नागपुरे या बंगल्यात राहात नाहीत. मात्र, येथे त्यांच्या काही बैठका होतात. या बंगल्याच्या पुढील आणि मागील बाजूस मोठा लॉन आहे. त्यात अनेक वर्षांपासूनची पूर्ण वाढ झालेली झाडे आहेत. यातील सुमारे १९ झाडे मे महिन्यात कापण्यात आली. यात चिंच, उंबर तसेच अन्य झाडांच्या सर्व फांद्या तर कापल्याच; परंतु केवळ बुंधाच शिल्लक ठेवला आहे.
आदेश देऊनही एक महिना होत आला
यासंदर्भातील वृत्तमाध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून झाडांना कीड लागल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, ही झाडे कापण्यासाठी परवानगी घेतली होती का, पंचनामे झाले का? यासह अनेक प्रश्न प्रसार माध्यमांनी उपस्थित केले. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून खुलासा करणारा अहवाल मागवला. आता, हे आदेश देऊनही एक महिना होत आला तरी अद्याप याचा अहवाल संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने दिलेला नाही.
विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
याविषयात क्षेत्रीय कार्यालयाकडून अद्याप अहवाल आपल्याकडे आला नसल्याचे उद्यान विभागाचे प्रमुख डॉ. अशोक घोरपडे यांनी सांगितले, तर घोरपडे यांच्याकडून आपल्याला अहवाल प्राप्त झाला नसल्याचे, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले. एकमेकांच्या वेळेचे कारण देत या विषयावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.


