Skip to content

सत्ताधारी भाजपकडून लोकप्रतिनिधींचा अपमान होतो: विरोधकांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्यसभेत आंदोलन केले

PG
Prashik Ghaste

1 min read

सत्ताधारी भाजपकडून लोकप्रतिनिधींचा अपमान होतो: विरोधकांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्यसभेत आंदोलन केले

निलेश राऊत
पुणे: महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये कोणताही प्रोटोकॉल पाळण्यात येत नाही. सत्ताधारी भाजपकडून लोकप्रतिनिधींचा अपमान केला जात आहे. पालिकेच्या कार्यक्रमांत विधानसभेच्या आमदारांना डावलून विधान परिषदेच्या आमदारास भाषण करू दिले जाते, उपमहापौरांनी दुसऱ्या रांगेत बसविले जाते, सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल पाळणार आहात की नाही, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी सोमवारी मुख्यसभेत आंदोलन केले.

स्थानिक प्रतिनिधींना डावलण्यात येते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी विविध विकास कामांचे उद्घाटन, तसेच भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपकडून शासकीय शिष्टाचार पाळला जात नसल्याचा आरोप निकम यांनी केला. महापालिकेचे बाणेर येथील आपुलकी हेल्थकेअर कॅन्सर हॉस्पिटल, छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे अनावरण आणि महमंदवाडी येथील पाण्याच्या टाक्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्थानिक प्रतिनिधींना डावलण्यात आले.

विरोधी पक्ष नेते नीलेश निकम म्हणाले, "महमंदवाडी येथील पाण्याच्या टाक्याच्या उद्घाटनावेळी आमदार चेतन तुपे यांना भाषण करू दिले नाही. याउलट विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांना भाषण करू दिले. हा लोकप्रतिनिधींचा अपमान आहे. असे प्रकार वारंवार होत असून, हे खपवून घेतले जाणार नाही. उपमहापौर परशुराम वाडेकर यांची खुर्ची मागे ठेवण्यात आली होती, तसेच त्यांना समारोप करू दिला नाही. महापालिका लोकप्रतिनिधींचा अपमान केला जात आहे. कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक नगरसेवकांची नावे टाकली जात नाहीत, याचा तीव्र शब्दांत निषेध आम्ही करतो."

यावर महापौर मंजुषा नागपूरे म्हणाल्या, "संबंधित आमदारांनी मला कळविले नाही. ज्यांना भाषणाची संधी दिली त्यांनी मला फोन करून सांगितले होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रोटोकॉल ठरविण्यात आला होता."

आचारसंहितेमुळे गुंडाळली पालिकेची मुख्य सभा
मुख्य सभा सुरू असतानाच विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे सभेत दाखल करण्यात आलेल्या विषयांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेची मे महिन्याची मुख्य सभा सोमवारी (दि. १८) दुपारी सव्वा तीन वाजता सुरू झाली. तत्पूर्वी सकाळी ११:००च्या सुमारास विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी निवडणुकीची घोषणा झाली. मात्र, याबाबतचे आदेश दुपारी आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

पुणे न्युज

Share