Thane Crime News : ठाणे पोलिसांची धडक कारवाई; कुख्यात ड्रग्स तस्कर इर्फान सय्यदला PIT-NDPS कायद्यांतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध
•कळवा, मुंब्रा आणि गुजरातमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल; सराईत तस्कराला नाशिक कारागृहात पाठवले.
1 min read

•कळवा, मुंब्रा आणि गुजरातमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल; सराईत तस्कराला नाशिक कारागृहात पाठवले.
ठाणे :- ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका कुख्यात आणि सराईत ड्रग्स तस्कराविरोधात अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. इर्फान अलीम सय्यद (वय 44, रा. मुंब्रा, ठाणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. कळवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल असून खटला प्रलंबित आहे.
मात्र, हा आरोपी यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांतून जामिनावर बाहेर सुटल्यानंतरही पुन्हा सक्रिय होऊन अंमली पदार्थांच्या विक्रीचा अवैध व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे अत्यंत आवश्यक होते.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने थेट नाशिक कारागृहात रवानगी
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, ठाणे पोलीस आयुक्तांनी आपल्या प्राप्त अधिकारांचा वापर करत PIT-NDPS Act 1988 च्या कलम 3(1) अन्वये इर्फान अलीम सय्यद याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. त्यानुसार, 28 ऑक्टोबर 2026 रोजी या आदेशाची अंमलबजावणी करत त्याला 1 वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
आरोपी इर्फान अलीम सय्यद याच्या विरोधात यापूर्वी कळवा पोलीस ठाणे, शिल डायघर पोलीस ठाणे, मुंब्रा पोलीस ठाणे,वॅलनिमदा पोलीस ठाणे (अहमदाबाद, गुजरात). येथे
एन.डी.पी.एस. नुसार गुन्हा दाखल आहे.
अंमली पदार्थांची विक्री, साठा किंवा वाहतूक करणे हा गंभीर व समाजविघातक गुन्हा असून, अशा तस्करांविरोधात ठाणे पोलिसांची मोहीम अशीच कडक चालू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


