Skip to content

"कर भरपूर, सुविधा शून्य!"

औताडे-हांडेवाडीतील १८ सोसायट्यांचा एल्गार; ८ मे पासून जनआंदोलनाचा पवित्रा

PG
Prashik Ghaste

2 min read

"कर भरपूर, सुविधा शून्य!"

औताडे-हांडेवाडीतील १८ सोसायट्यांचा एल्गार; ८ मे पासून जनआंदोलनाचा पवित्रा

२७ कोटींचा टॅक्स भरूनही टँकरचे चटके आणि अंधाराचे साम्राज्य; प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ आणि रहिवासी एकवटले

पुणे: “मूलभूत सुविधा हा आमचा हक्क आहे, उपकार नाही!” अशा ठाम भूमिकेतून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील औताडे-हांडेवाडी परिसरातील नागरिक आता रस्त्यावर उतरणार आहेत. दरवर्षी २७ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर भरूनही रस्ते, पाणी आणि ड्रेनेज यांसारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित असलेल्या १८ प्रमुख सोसायट्यांचे रहिवासी आणि स्थानिक ग्रामस्थांनी ८ मे पासून ‘जनआंदोलन’ छेडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या चालढकलीला कंटाळून आता थेट ‘उपोषण’ आणि ‘प्रतीकात्मक अंत्ययात्रा’ काढत आपला संताप व्यक्त केला जाणार आहे.

काय आहेत रहिवाशांच्या मुख्य तक्रारी?
हद्दीत समाविष्ट होऊनही पुणे महानगरपालिकेकडून या भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नाही. रहिवाशांना दरवर्षी लाखो रुपये खर्च करून खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच, पावसाळ्यात ड्रेनेज लाईन अभावी पाणी साचणे, स्ट्रीट लाईटची कमतरता आणि खराब रस्ते यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याशिवाय, महावितरण कडून होणारा वारंवार खंडित वीजपुरवठा आणि लाईन ट्रिपिंगमुळे घरगुती उपकरणांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

आंदोलनाची रूपरेषा
प्रशासनाला जागे करण्यासाठी रहिवाशांनी दोन दिवसांचे कडक आंदोलन जाहीर केले आहे:

  • ८ मे २०२६: सकाळी ९ वाजल्यापासून हांडेवाडी चौक येथे बेमुदत ‘उपोषण’ सुरू केले जाईल.
  • ९ मे २०२६: सकाळी ९ वाजता हांडेवाडी चौक ते भुजबळ टाकी सातवनगर अशी प्रशासनाची ‘प्रतीकात्मक अंत्ययात्रा’ काढली जाईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता हांडेवाडी चौकात ‘ठिय्या आंदोलन’ केले जाईल.
  • १८ सोसायट्यांचा सक्रिय सहभाग
    या आंदोलनात सिम्पलीसिटी सोसायटी, मॅजेस्टिक रिदम काऊंटी, ओरिएंट पॅलेस, किंगस्टन ऑरा, व्यंकटेश क्लासिक, धनश्री आनंद, मावेन्स विआन, फॉर्च्युन इम्प्रेस, स्वप्नपूर्ती, सिल्वर स्टोन, फॉर्च्युन सिद्धीप्रिया, लश लाईफ, धनश्री आशियाना, ऑस्ट्रिया ग्रँड, मंत्रा सेन्सेस, निको बेमाउन्ट, धनश्री अंगण आणि कॅसलिनो टॉवर्स या सोसायट्यांचे शेकडो नागरिक सहभागी होणार आहेत.

    “आम्ही २७ कोटींहून अधिक कर भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधांसाठी खाजगी टँकरवर का अवलंबून राहावे लागते? महापालिकेने आमची आर्थिक पिळवणूक थांबवावी आणि त्वरित ड्रेनेज, रस्ते आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल,” असा इशारा ‘समस्त औताडे हांडेवाडी ग्रामस्थ आणि सोसायटी रहिवासी’ यांच्या वतीने अशी माहिती त्यांचे प्रतिनिधी आशिष इंगळे, आनंद कांबळे, विनोद शिंदे आणि प्रणय पाटील यांनी दिली.

    Share