Skip to content

Satara News : दुष्काळग्रस्तांना मदत करा, निवडणुका नंतर घ्या : सुप्रिया सुळे

Satara News : सातारा : राज्यात दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण जनता होरपळत असताना सरकारला निवडणुकांची घाई कशासाठी, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

दुष्काळग्रस्तांना मदत करा, निवडणुका नंतर घ्या : सुप्रिया सुळे
दुष्काळग्रस्तांना मदत करा, निवडणुका नंतर घ्या : सुप्रिया सुळे

Satara News : सातारा : राज्यात दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण जनता होरपळत असताना सरकारला निवडणुकांची घाई कशासाठी, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. शक्तीपीठ महामार्गासाठी एक लाख कोटी रुपये उभे करण्याची तयारी सरकार दाखवते; मग दुष्काळग्रस्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी निधी का उपलब्ध करून दिला जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘आधी मायबाप जनतेला मदत करा आणि निवडणुका नंतर घ्या,’ अशी मागणी त्यांनी केली.https://maharashtramirror.com/ Satara News

सातारा येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Satara news

सुळे म्हणाल्या, शक्तीपीठ महामार्ग दोन वर्षे उशिरा झाला, तर फार मोठे नुकसान होणार नाही. मात्र पैशाअभावी एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण थांबले, तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, विद्यार्थ्यांची फी माफी आणि सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांना पाणी आणि अन्नाची चिंता असताना जिल्हा बँकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी केला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलाव्यात. सध्या राजकारण करण्याची नव्हे, तर दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आहे, असे सुळे यांनी सांगितले.

सरकारच्या निर्णयांवरही निशाणा
रोजगार हमी योजना अधिक बळकट करण्याऐवजी त्यात बदल करणे आणि जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) निधी गोठवणे चुकीचे असल्याचे सुळे म्हणाल्या. मतदार यादीतील मतदारसंख्या कमी झाल्याच्या प्रकाराची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेऊन सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधत तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा दोन दिवसांत करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

‘जिल्हा परिषदांना दमदाटी करण्याची ताकद सरकारकडे आहे; मात्र त्याच जिल्ह्यातील जनतेला मदत करण्यासाठी वेळ नाही. सरकारने आधी जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावे,’ असा घणाघात सुळे यांनी केला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share