शिरूर येथील साखर कारखान्याची २४ लाखांची फसवणूक; जळगावच्या तिघांवर गुन्हा
ऊसतोडणी मजूर पुरवण्याची बतावणी करून केला विश्वास संपादन
1 min read

ऊसतोडणी मजूर पुरवण्याची बतावणी करून केला विश्वास संपादन
पुणे: शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील ‘पराग ॲग्रो फूड्स अँड अलाईड प्रॉडक्ट्स’ या साखर कारखान्याला ऊसतोडणी मजूर पुरवतो, अशी बतावणी करून २४ लाख ३८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

राहुल रामदास भाकरे (वय ३६, रा. माळवाडी, टाकळीहाजी, ता. शिरूर) यांनी यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरख भारमल राठोड, नितीन तुळशीराम चव्हाण आणि ज्ञानेश्वर गबरू राठोड (सर्व रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ जुलै २०२५ रोजी रावडेवाडी येथील पराग ॲग्रो साखर कारखान्याच्या हद्दीत घडली. आरोपींनी संगनमत करून कारखान्याला ऊसतोड मजूर पुरवण्याचे खोटे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी लेखी करार करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या करारापोटी गोरख राठोड याने ८ लाख १८ हजार रुपये, नितीन चव्हाण याने ४ लाख ८६ हजार रुपये आणि ज्ञानेश्वर राठोड याने ११ लाख ३४ हजार रुपये, अशी एकूण २४ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर जमा करून घेतली.
मात्र, मोठी रक्कम स्वीकारूनही आरोपींनी कराराप्रमाणे ऊसतोड मजूर पुरवले नाहीत. आपली आणि कारखान्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भाकरे यांनी पोलिसांत धाव घेतली. शिरूर पोलिसांनी २३ एप्रिल २०२६ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ऊसतोड मजुरांच्या टोळ्या पुरवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले असून, पोलिसांनी या टोळीच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Sugar factory in Shirur cheated of Rs 24 lakhs; Case against three from Jalgaon


