Skip to content

विमाननगरमध्ये चालकानेच घरमालकाचे ११ लाखांचे दागिने पळवले

फिर्यादीची नजर चुकवून घरातून तसेच कारमध्ये ठेवलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

PG
Prashik Ghaste

1 min read

विमाननगरमध्ये चालकानेच घरमालकाचे ११ लाखांचे दागिने पळवले

फिर्यादीची नजर चुकवून घरातून तसेच कारमध्ये ठेवलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

पुणे: विमाननगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीत आपल्या मालकाचा विश्वास संपादन करून ड्रायव्हरनेच घरांतून आणि कारमधील बॅगेतून सुमारे ११ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ५ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत विमाननगरमधील ‘कोनार्क कॅम्पस’ येथे हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरात राहणाऱ्या एका ५७ वर्षीय इसमाने यासंदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्याकडे आरोपी चालक म्हणून कामाला होता. मागील काही दिवसांपासून आरोपीने फिर्यादी यांची नजर चुकवून घरातून तसेच कारमध्ये ठेवलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास करण्यास सुरुवात केली. दागिन्यांची बॅग तपासल्यानंतर हा चोरीचा प्रकार समोर आला.

चोरून नेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ११ लाख ८५ हजार रुपये आहे. मालकाने पूर्ण विश्वास टाकून घराची आणि कारची जबाबदारी सोपवली असताना, आरोपीने त्याचा गैरफायदा घेत ही चोरी केली. फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, आरोपी अद्याप फरार आहे.

विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक के. एस. गुंड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घरगुती नोकर किंवा चालक कामावर ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती आणि चारित्र्य पडताळणी (Police Verification) करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी या निमित्ताने नागरिकांना केले आहे.

Driver steals homeowner's jewelry worth 11 lakhs in Vimannagar

Share