Skip to content

Sanjay Raut : "आधी फाशी मग चौकशी, विरोधकांसाठीच का?"; भोंदू खरात प्रकरणात संजय राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांवर घणाघात

• चाकणकरांचा राजीनामा ही केवळ सुरुवात; खरातला 'राजमान्यता' देणारे मंत्रीमंडळातच, राऊतांनी 40 आमदारांच्या नावांची केली मागणी

V
Vivek

2 min read

Sanjay Raut

•चाकणकरांचा राजीनामा ही केवळ सुरुवात; खरातला 'राजमान्यता' देणारे मंत्रीमंडळातच, राऊतांनी 40 आमदारांच्या नावांची केली मागणी

मुंबई :- नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचे लोण आता राज्याच्या राजकारणात खोलवर पसरले आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून राज्य सरकार आणि विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. "खरातला राजमान्यता देणारे लोक आजही फडणवीसांच्या मंत्रिमंडळात बसलेले आहेत," असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.

"केवळ चाकणकरच का? 40 आमदारांची नावे जाहीर करा"

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, "हे प्रकरण राज्याला कलंकित करणारे आणि अत्यंत लाजिरवाणे आहे. मात्र, यात केवळ चाकणकरच आहेत का? खुद्द मंत्री दीपक केसरकर विचारत आहेत की 'माझंच नाव का? 40 आमदार तिथे जात होते'. मग हे 40 आमदार कोण? खरात बाबाच्या पायाचे तीर्थ पिणारे ते मंत्री कोण? याची यादी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावी."

विशेष विमानांची सोय करणारे 'व्हीआयपी' कोण?

अशोक खरातच्या वाढत्या प्रस्थळावर बोट ठेवत राऊतांनी विचारले की, "खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधील ते प्रभावशाली लोक कोण होते? हा बाबा दिल्लीत जाऊन कोणाला भेटत होता? त्याचा वावर मंत्रालयापासून दिल्लीपर्यंत कोणाच्या जीवावर होता? जणू काही सरकारने त्याला अधिकृत राजमान्यताच दिली होती की काय, असा त्याचा वावर होता."

"विरोधी पक्ष असता तर आधी फाशी, मग चौकशी!"

नरहरी झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना राऊतांनी सत्तेतील दुजाभावावर टीका केली. "विरोधी पक्षाच्या बाबतीत असे काही घडले असते, तर सरकारने आधी फाशी दिली असती आणि मग चौकशी केली असती. पण स्वतःच्या लोकांच्या बाबतीत मात्र 'व्हिडीओची सत्यता पडताळू' अशी गुळगुळीत उत्तरे दिली जात आहेत. किरीट सोमय्यांच्या व्हिडीओचे काय झाले? अशा प्रकरणांत सत्यता कधीच पडताळली जात नाही, केवळ वेळ मारून नेली जाते," असा टोला त्यांनी लगावला.

खरातला 'पंचमहाभूत' ठरवण्याचा प्रयत्न

"खरातचा वावर सर्वत्र होता, बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा असे सरकारला वाटत होते," असे म्हणत राऊतांनी सरकारमधील मंत्र्यांच्या अंधश्रद्धेची खिल्ली उडवली. "ज्यांनी या भोंदूला मोठे केले, ते आजही सत्तेत मानाने बसले आहेत, त्यांच्यावर फडणवीस कधी बोलणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: Ratnagiri Bribe News : रत्नागिरी पाटबंधारे विभागात 'एसीबी'चा मोठा दणका! 2 लाखांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंत्यासह लिपिक जाळ्यात

Share