Skip to content

Sanjay Raut : "संसदेत लोकशाहीचा गळा घोटला जातोय"; लोकसभा अध्यक्षांविरुद्धच्या अविश्वास ठरावावरून संजय राऊतांचा संताप

Sanjay Raut Latest News : "भारत अमेरिकेचा गुलाम होतोय का?" देशाच्या अपमानावर पंतप्रधान गप्प का?

V
Vivek

1 min read

Sanjay Raut

Sanjay Raut Latest News : "भारत अमेरिकेचा गुलाम होतोय का?" देशाच्या अपमानावर पंतप्रधान गप्प का? राऊतांचा केंद्र सरकारवर तिखट वार

नवी दिल्ली :- लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात 'इंडिया' (INDIA) आघाडीने अविश्वास ठराव मांडल्याने राजधानीतील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षांवर जोरदार टीका केली आहे. "गेल्या 10 वर्षांपासून संसदेत लोकशाहीचा गळा घोटला जात असून, विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा हा उद्रेक आहे," अशा शब्दांत राऊतांनी आपली भूमिका मांडली.

लोकशाही आणि संविधानाचे उल्लंघन

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, संसदेत विरोधी नेत्यांना बोलू दिले जात नाही, त्यांना सातत्याने अपमानित केले जाते आणि नियमांनुसार कामकाज चालवले जात नाही. "राष्ट्रीय हिताच्या आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा होऊ दिली जात नाही. सत्ताधारी पक्षाला आपल्या बहुमताचा अहंकार आहे, त्यामुळेच त्यांनी विरोधकांचा आवाज बंद केला आहे. अशा परिस्थितीत अविश्वास ठराव हेच एकमेव हत्यार आमच्याकडे उरले होते," असे त्यांनी स्पष्ट केले. या ठरावाला इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे पूर्ण समर्थन असल्याचेही त्यांनी सांगितले.

"भारत अमेरिकेचा गुलाम होतोय का?"

संजय राऊत यांनी जागतिक राजकारणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. "देशाचा अमेरिकेसारख्या राष्ट्राकडून वारंवार अपमान होत आहे, पण पंतप्रधान त्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. 1947 पूर्वी आपला देश ब्रिटिशांचा गुलाम होता, मात्र अलीकडच्या काळात भारत अमेरिकेचा गुलाम होताना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे," असे राऊत म्हणाले. देशाच्या अस्मितेपेक्षा पंतप्रधानांना राजकीय भाषणांमध्ये अधिक रस असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

संसदेत चर्चेला बंदी हीच हुकूमशाही

देशाच्या अपमानाबाबत संसदेत चर्चा करण्यासाठी विरोधकांनी वेळ मागितला होता, मात्र लोकसभा अध्यक्षांनी तो नाकारल्याचा आरोप राऊतांनी केला. "जेव्हा अध्यक्षांकडून चर्चेला मज्जाव केला जातो, तेव्हा ती अप्रत्यक्ष गुलामगिरी आणि हुकूमशाहीच असते. पंतप्रधानांना पश्चिम बंगालमधील घटनांवर बोलायला वेळ आहे, पण देशाच्या जागतिक स्तरावरील अपमानावर ते गप्प का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Share