Pune News : संदीप उद्योग समूहा’वर आयकर विभागाचे मोठे छापे
Pune News :अहिल्यानगर/ पुणे: अहिल्यानगर आणि पुण्यातील व्यावसायिक तसेच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे.
1 min read

Pune News : हॉटेल व्यावसायिक आणि माजी महापौर संदीप कोतकर आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांची अहिल्यानगरमधील प्रमुख आस्थापने, हॉटेल्स आणि केडगाव येथील निवासस्थानासह विविध ठिकाणी तपासणी मोहीम
Pune News :अहिल्यानगर/ पुणे: अहिल्यानगर आणि पुण्यातील व्यावसायिक तसेच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरचे माजी महापौर आणि प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक संदीप कोतकर आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या ‘संदीप उद्योग समूहा’वर प्राप्तिकर विभागाने धडक कारवाई करत छापे टाकले आहेत. पुण्याच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून, अहिल्यानगरमधील प्रमुख आस्थापने, हॉटेल्स आणि केडगाव येथील निवासस्थानासह विविध ठिकाणी ही तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
भल्यापहाटे सुरू झाली कारवाई
प्राप्त माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या पुणे येथील पथकाने बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून या छापासत्र कारवाईला सुरुवात केली. ही कारवाई दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील प्रसिद्ध हॉटेल संदीप, हॉटेल सचिन यांसारख्या व्यावसायिक आस्थापनांवर तसेच केडगाव परिसरातील कोतकर कुटुंबीयांच्या निवासस्थानी आयकर पथकाने एकाच वेळी धाडी टाकल्या. याशिवाय या समूहाशी संबंधित असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या निवासस्थानीही कसून तपासणी करण्यात आली. एकाच वेळी अनेक ठिकाणी पथके धडकल्यामुळे व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली.
हॉटेल व्यवसाय आणि हेलिकॉप्टर खरेदीमुळे चर्चा
संदीप उद्योग समूहाची हॉटेल्स त्यांच्या विशिष्ट खाद्यसंस्कृतीसाठी आणि जेवणासाठी राज्यभर अत्यंत प्रसिद्ध आहेत. अहिल्यानगर आणि पुण्यातील या हॉटेल्समध्ये खाद्यप्रेमींची नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते, आणि वीकेंडला येथे खवय्यांच्या लांबच लांब रांगा लागतात. याआधी गेल्या वर्षी कोतकर कुटुंबीयांनी एक ७ सीटर हेलिकॉप्टर खरेदी केले होते, ज्यामुळे हा उद्योग समूह आणि कोतकर कुटुंब संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते. याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाने टाकलेल्या या अचानक छाप्यांमुळे विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
आर्थिक कागदपत्रांची कसून पडताळणी
आयकर पथकाने सुरु केलेल्या या कारवाईमध्ये हॉटेलचे आर्थिक व्यवहार, कर भरणा, डिजिटल नोंदी आणि मालमत्तांच्या कागदपत्रांची कसून पडताळणी केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत या समूहाच्या कार्यालयांमध्ये आणि निवासस्थानांवर तपासणीचे सत्र सुरूच होते. या छाप्यांदरम्यान मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता किंवा करचोरी समोर आली आहे का, याबाबत आयकर विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे अहिल्यानगर आणि पुण्यातील राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी चलबिचल पाहायला मिळत आहे.


