Sabha Raut : "महाराष्ट्रात खरात फाईल्सचा स्फोट!"; संजय राऊतांनी घेतली 'एपस्टीन फाईल्स'शी तुलना, मुख्यमंत्र्यांच्या 'गुप्त ऑपरेशन'चे केले कौतुक
Sanjay Raut Latest News : भोंदू बाबाच्या मोबाईलमधील क्लिप्समुळे अर्धे मंत्रिमंडळ तणावात; 9 मंत्री नियमित भक्त असल्याचा राऊतांचा खळबळजनक दावा
2 min read

Sanjay Raut Latest News : भोंदू बाबाच्या मोबाईलमधील क्लिप्समुळे अर्धे मंत्रिमंडळ तणावात; 9 मंत्री नियमित भक्त असल्याचा राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबई :- नाशिकचा स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि 'कॅप्टन' म्हणून मिरवणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्या सेक्स स्कँडलने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी याची तुलना थेट जागतिक स्तरावर गाजलेल्या 'एपस्टीन फाईल्स'शी केली आहे. "जगात एपस्टीन फाईल्स, तर महाराष्ट्रात आता 'खरात फाईल्स' बाहेर येत आहेत," असे म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे.
मुख्यमंत्र्यांचे 'गुप्त ऑपरेशन' आणि राऊतांकडून अभिनंदन
नेहमीच सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचे आश्चर्यकारकपणे कौतुक केले आहे. गेल्या 15 दिवसांपासून मुख्यमंत्री गृहखात्याच्या माध्यमातून अत्यंत गुप्तपणे या प्रकरणाचा छडा लावत होते, अशी माहिती समोर आली आहे.
"या प्रकरणाची पाळमुळे उखडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश आणि पोलिसांच्या विशेष पथकाने यशस्वी केलेले हे ऑपरेशन कौतुकास पात्र आहे. महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या अशा प्रवृत्तींची साफसफाई जर मुख्यमंत्री करत असतील, तर त्यांचे अभिनंदन करायला हवे," असे राऊत म्हणाले.
मंत्रिमंडळातील 9 मंत्री 'भोंदू'चे भक्त?
राऊतांनी यावेळी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, सध्याच्या राज्य मंत्रिमंडळातील तब्बल 9 मंत्री या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्याच्याकडे जाऊन घृणास्पद विधी करत होते.
मंत्री तणावाखाली: खरातच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह क्लिप्स सापडल्या असून, त्यामुळे मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री प्रचंड तणावाखाली आहेत.
आयसीयूची वेळ: यातील काही मंत्र्यांची प्रकृती इतकी बिघडली आहे की त्यांना आयसीयूमध्ये भरती करावे लागले आहे, अशी खोचक टीकाही राऊतांनी केली.
"रुपाली चाकणकरांना तर जावेच लागेल"
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या खरातसोबतच्या फोटोंवरून राऊतांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "हा विषय केवळ महिला आयोगाच्या अध्यक्षांपुरता मर्यादित नाही, तर यामध्ये अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र, नैतिक जबाबदारी स्वीकारून चाकणकरांना पद सोडावेच लागेल. त्यांना पदावरून हटवण्यात जर मुख्यमंत्री कमी पडले, तर ते राज्याचे दुर्दैव ठरेल," असा इशारा त्यांनी दिला.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 24 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरातने जमवलेली कोट्यवधींची माया, त्याचे राजकीय कनेक्शन आणि पीडित महिलांचे शोषण या सर्व बाबींचा तपास आता एसआयटी (SIT) मार्फत वेगाने सुरू आहे.


