Skip to content

Crime News : साताऱ्यात वृद्ध महिलेला लुटणारा सराईत गुन्हेगार पुणे पोलिसांच्या जाळ्यात

आरोपी शिवाजीनगर येथील इराणी वस्तीचा रहिवाशी

DJ
Dattatraya Jadhav

2 min read

satara irani
satara irani

आरोपी शिवाजीनगर येथील इराणी वस्तीचा रहिवाशी

  • इब्राहिम इराणी याने केवळ साताराच नव्हे, तर पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि रायगड परिसरातही ज्येष्ठ नागरिकांना फसविण्याचे आणि चोरीचे अनेक गुन्हे केले आहेत.
  • पुणे, एप्रिल ७, महाराष्ट्र मिरर : साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातचलाखी करून एका वृद्ध महिलेला लुटून पसार झालेल्या सराईत इराणी गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. इब्राहिम बाबू इराणी असे या आरोपीचे नाव असून, तो पुणे शहरातील इराणी वस्तीत राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    नेमकी घटना काय?
    दिनांक २७ मार्च २०२६ रोजी साताऱ्यातील प्रतापगंज पेठ येथील आयडीबीआय बँकेत एका वृद्ध महिलेला गाठून आरोपीने हातचलाखी केली होती. त्याने महिलेच्या नजरेत धूळ फेकून त्यांच्याकडील ७,००० रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा (भा.न्या.सं. कलम ३१८(४)) दाखल करण्यात आला होता.

    अशी झाली अटक
    शाहूपुरी पोलिसांनी या गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रसारित केले होते. हे फुटेज शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महेंद्र कडू यांनी पाहिले आणि त्यांच्या गुप्त बातमीदारांना सतर्क केले. गस्तीवर असताना कडू यांना बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली की, फुटेजमधील व्यक्ती ही शिवाजीनगर येथील इराणी वस्तीतील इब्राहिम बाबू इराणी आहे.या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने इराणी वस्तीत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने साताऱ्यातील गुन्ह्याची कबुली दिली.

    अनेक जिल्ह्यांत गुन्हे दाखल
    तपासादरम्यान असे समोर आले आहे की, आरोपी इब्राहिम इराणी याने केवळ साताराच नव्हे, तर पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि रायगड परिसरातही ज्येष्ठ नागरिकांना फसविण्याचे आणि चोरीचे अनेक गुन्हे केले आहेत.

    तपास पथक
    ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    पथकातील सदस्य: वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहा. पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस अंमलदार संतोष मेमाणे, सचिन जाधव, महेंद्र कडू आणि रोहित झांबरे. पुढील तपासासाठी आरोपीला शाहूपुरी पोलीस (सातारा) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    Habitual Offender Who Robbed Elderly Woman Caught in Pune Police Net

    Share