Skip to content

राष्ट्रीय सुरक्षेसाठी जबाबदार माध्यमांची गरज: माजी लष्करप्रमुख जनरल पांडे

कै ज.

PG
Prashik Ghaste

2 min read

राष्ट्रीय सुरक्षेसाठी जबाबदार माध्यमांची गरज: माजी लष्करप्रमुख जनरल पांडे

कै ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन

निलेश राऊत
पुणे: राष्ट्रीय सुरक्षा आणि माध्यमांची भूमिका या दोन्ही गोष्टी एकमेकांशी घट्ट जोडलेल्या असून, मजबूत लोकशाहीसाठी सुरक्षित राष्ट्राबरोबरच मुक्त, विश्वासार्ह आणि जबाबदार माध्यमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक कै ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात "राष्ट्रीय सुरक्षा आणि माध्यमांची भूमिका" या माध्यमांची भूमिका" या विषयावर पांडे यांनी मांडणी केली.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.

राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सीमांचे रक्षण नाही
मनोज पांडे म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सीमांचे रक्षण किंवा लष्करी ताकदीपुरती मर्यादित नसून आर्थिक स्थैर्य, सामाजिक ऐक्य, लोकांचा संस्थांवरील विश्वास, सायबर सुरक्षा आणि माहिती व्यवस्थापन यांचाही त्यात समावेश आहे. आजचे युद्ध केवळ सीमांवर लढले जात नसून माहिती, सायबर स्पेस, सोशल मीडिया आणि पर्सेप्शन मॅनेजमेंटच्या माध्यमातूनही लढले जात असल्याचे ते म्हणाले.

सोशल मीडियावरील अफवा शत्रूना मदत करू शकतात
रशिया-युक्रेन युद्ध, मुंबईवरील २६/११ हल्ला, इस्रायल-हमास संघर्ष यांचा संदर्भ देत त्यांनी माध्यमांनी संयम -जबाबदारी जपण्याची गरज अधोरेखित केले. थेट प्रक्षेपण, अप्रमाणित माहिती-सोशल मीडियावरील अफवा शत्रूना मदत करू शकतात. सोशल मीडियामुळे नागरिक हा कंटेंट निर्माता झाला असून, डीपफेक, फेक नॅरेटिव्ह आणि चुकीच्या माहितीचे प्रमाण वाढले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या काही थोरणांवर प्रश्न विचारण्यात आले नाही
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात प्रसारमाध्यमे राष्ट्रीय उद्दिष्टांशी पूर्णतः सुसंगत होती. राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेला माध्यमांनी सकारात्मक साथ दिली. समाजात राष्ट्रीय भावना बळकट करण्याचे कार्य केले. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या काही थोरणांवर माध्यमांकडून अपेक्षित प्रमाणात प्रश्न विचारण्यात आले नाही, अशी खंत मनोज पांडे यांनी व्यक्त केली.

मॉनिटरिंग महत्त्वाचे
माध्यमांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर जबाबदारी, संयम, पडताळणी, सामाजिक स्थैर्य आणि लोकशाही मूल्यांचा आदर या 'फाइव्ह आर' तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन पांडे यांनी केले. पत्रकार आणि सुरक्षा यंत्रणांनी एकमेकांना प्रतिस्पर्धी न मानता विश्वासाचे नाते निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. सायबर युद्ध आणि माहिती युद्धाच्या नव्या आव्हानावर सरकार व लष्कर गंभीरपणे काम करत असल्याचे सांगत त्यांनी भविष्यात इंटरनेट आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग अधिक महत्त्वाचे ठरणार असल्याचेही सांगितले.

Share