Raj Thackeray : अजित पवार अपघात प्रकरण: "सरकारच संशयाची भूतं नाचवतंय!"; रोहित पवारांच्या पाठीशी राज ठाकरे ठाम, पोलिसांच्या भूमिकेवर उठवले प्रश्न
•FIR नोंदवायला सरकार का घाबरत आहे?
1 min read

•FIR नोंदवायला सरकार का घाबरत आहे? | ब्लॅक बॉक्सचे गौडबंगाल काय? | सुनेत्रा वहिनी आणि मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे - राज ठाकरेंचा घणाघात
मुंबई :- अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी आणि संबंधित विमान कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आज 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आणि रोहित पवारांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला.
पोलीस तक्रार का घेत नाहीत?
राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर संशय व्यक्त केला. ते म्हणाले, "रोहित पवार यांनी तीन ठिकाणी तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस एफआयआर (FIR) घेत नाहीत. मरीन ड्राईव्हला तर एक अधिकारी तक्रार लिहीत असताना अचानक डीसीपी येतात आणि सांगतात की तक्रार घेऊ नका; हे नेमके काय सुरू आहे? राज्यात कुठेही झिरो एफआयआर नोंदवता येतो असे सरकार सांगते, मग इथेच अडथळे का?"
ब्लॅक बॉक्स आणि टेक्निकल बाबी
अपघाताच्या तांत्रिक बाबींवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, "विमान कितीही विस्कळीत झाले तरी 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित राहतो. पण त्याचे पुढे काय झाले, हे अजून स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक गोष्टी बाजूला ठेवल्या तरी किमान तक्रार नोंदवून घेण्यास सरकार का नकार देत आहे? जर एका आमदाराची तक्रार पोलीस घेत नसतील, तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील?"
सुनेत्रा वहिनी आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन
या संवेदनशील विषयात राजकारण आणू नका, असे आवाहन करत राज ठाकरेंनी थेट सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. "सुनेत्रा वहिनी आता सरकारमध्ये आहेत, त्यांनी यावर बोलायला हवे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू होतो आणि कुटुंबियांना एफआयआरसाठी वणवण फिरावे लागते, यातच काहीतरी 'काळं-बेरं' असल्याचा संशय बळावतो," असेही ते म्हणाले.


