Pune News : महापालिकेच्या पाणीकपातीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह;दिवाळीनंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेकडून शहरात पाणीबचतीसाठी दर आठवड्याला पाणीकपात केली जात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून निश्चित कोट्यापेक्षा अधिक पाणी धरणांमधून उचलले जात असल्याचा उघड दावा जलसंपदा विभागाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केला आहे.
2 min read

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेकडून शहरात पाणीबचतीसाठी दर आठवड्याला पाणीकपात केली जात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून निश्चित कोट्यापेक्षा अधिक पाणी धरणांमधून उचलले जात असल्याचा उघड दावा जलसंपदा विभागाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीकपातीच्या दाव्यांवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, पुढील वर्षाच्या जून २०२७ पर्यंत शहरासाठी अवघे ७.१५ टीएमसी पाणी शिल्लक राहिल्याने, दिवाळीच्या सणानंतर पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
महापालिकेने प्रमाणापेक्षा जास्त पाणी धरणांमधून उचलले
जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महापालिका शहरासाठी दरमहा सुमारे दीड टीएमसी पाणी उचलणे अपेक्षित असते. मात्र, चालू वर्षात जुलै महिन्यापासून महापालिकेकडून ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त पाणी धरणांमधून उचलले गेले आहे. जुलै ते ऑक्टोबर या काळात महापालिकेचा पाण्याचा वापर दरमहा दीड टीएमसीपेक्षा अधिक राहिला आहे..https://maharashtramirror.com/ Pune News
महापालिकेचा पाणी वापर
जुलै: १.६५३ टीएमसी
ऑगस्ट: १.७०४ टीएमसी
सप्टेंबर: १.९४० टीएमसी
ऑक्टोबर: १.६० टीएमसी
पाणीकपात कागदावरच?
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात महापालिकेने १५ टक्के पाणीकपात लागू केली होती, तरीदेखील पाण्याचा उपसा कमी न होता उलट तो वाढला. त्यामुळे 'पाणीकपात कागदावरच राहिली का?' असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.
पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या बैठकीत महापालिकेने यंदा २१ टीएमसी पाण्याची मागणी नोंदवली होती. मात्र, धरणांमधील एकूण २४ टीएमसी उपलब्ध साठ्यापैकी १३ टीएमसी पाणी पुढील वर्षाच्या ऑगस्टपर्यंत महापालिकेसाठी राखून ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय दौंड शहरासाठी सुमारे तीन टीएमसी पाणी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. १३ टीएमसीच्या मंजूर कोट्यापैकी महापालिकेने १ जुलैपासून आतापर्यंत सुमारे ६.३५ टीएमसी पाणी आधीच वापरले आहे. उर्वरित पाण्यातून १० टक्के पाणी आपत्कालीन राखीव साठा म्हणून ठेवावे लागणार आहे. त्यामुळे जून २०२७ पर्यंत शहरासाठी प्रत्यक्षात केवळ ७.१५ टीएमसी पाणीच शिल्लक राहते.
जानेवारीमध्ये पुन्हा आढावा बैठक
पाण्याच्या उपलब्धतेबाबत आणि महापालिकेच्या मागणीबाबत जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनात मतभेद दिसून येत आहेत. जलसंपदा विभागाची आकडेवारी आणि महापालिकेचा प्रत्यक्ष पाणीवापर यावरून मोठा संभ्रम निर्माण झाल्याने, यावर मार्ग काढण्यासाठी जानेवारी महिन्यात पुन्हा कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळीनंतर शहरात एक दिवसाआड पाणी?
पाण्याचा तुटवडा आणि शिल्लक राहिलेला मर्यादित साठा लक्षात घेता, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी स्पष्ट केले की, उपलब्ध साठा आणि शहराची मागणी यातील तफावत पाहता पाणीकपात करणे अनिवार्य ठरणार आहे. दिवाळीचा सण संपल्यानंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर विचाराधीन आहे.या निर्णयाबाबत महापालिका आयुक्त, महापौर आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच, पाणीटंचाईच्या तीव्रतेमुळे महापालिकेच्या काही प्रस्तावित भांडवली कामांना कात्री लावावी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
विरोधी पक्षांनी या पाणीवाटपावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे शहराला आवश्यकतेपेक्षा खूप कमी पाणी मंजूर करण्यात आले असून, बैठकीत लोकप्रतिनिधींनी पुणेकरांची बाजू भक्कमपणे मांडली नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे. पुढील काळात पाणीगळती रोखणे, बेकायदेशीर पाणीउचल थांबवणे आणि नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करणे, हेच पुण्याच्या पाणी व्यवस्थापनासमोरील मोठे आव्हान असेल


