Skip to content

Pune News : स्वयंभू ट्रान्सपोर्टचे कंत्राट रद्द करा; शिवसेनेचा इशारा

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेने घनकचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीचे कंत्राट तातडीने रद्द करून कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी जय महाराष्ट्र माथाडी कामगार सेना (शिवसेना) यांनी केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

स्वयंभू ट्रान्सपोर्टचे कंत्राट रद्द करा; शिवसेनेचा इशारा
स्वयंभू ट्रान्सपोर्टचे कंत्राट रद्द करा; शिवसेनेचा इशारा

Pune News : कचरा संकलनातील अनियमिततेचे आरोप; सात दिवसांत कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन


Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेने घनकचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीचे कंत्राट तातडीने रद्द करून कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी जय महाराष्ट्र माथाडी कामगार सेना (शिवसेना) यांनी केली आहे. यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, सात दिवसांत कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर तीव्र घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश माझिरे यांनी दिला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीकडून कचरा संकलनाचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. काही सोसायट्या आणि गल्लींमध्ये सलग दोन ते तीन दिवस कचरा संकलनाची गाडी येत नसल्याने नागरिकांना घरातच कचरा साठवून ठेवावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अनेक ठिकाणी गाड्या घरापर्यंत जात नसून, केवळ मुख्य रस्त्यांवरून फिरत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत तक्रारी

कचरा संकलनाची गाडी का आली नाही, अशी विचारणा करणाऱ्या नागरिकांना चालक आणि कर्मचारी उद्धट उत्तरे देत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्यास त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली जात असून, शिवीगाळ केली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कंत्राटातील अटींनुसार दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे अपेक्षित असताना त्याचे पालन होत नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. याशिवाय जीपीएस यंत्रणा बंद ठेवणे, कचरा संकलनाच्या फेऱ्या कमी करणे आणि कामगारांना वेतन न देणे, असे आरोपही कंपनीवर करण्यात आले आहेत.

वारजे-कर्वेनगर परिसरात कचऱ्याचे ढीग

प्रभाग क्रमांक ३० आणि ३२ तसेच अतुलनगर, वारजे-कर्वेनगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, डेंग्यूचा धोका वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेच्या वाहनांतून कचरा उचलण्याची मागणी

स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीचे कंत्राट रद्द करून संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, तसेच नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत महापालिकेच्या स्वतःच्या वाहनांद्वारे कचरा संकलनाची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सात दिवसांत कारवाई न झाल्यास पुणे महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निलेश माझिरे यांनी दिला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share