Pune News : गांधी जयंतीनिमित्त पुण्यात १७ किमी ‘सत्याग्रह मार्च’
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पुणे ॲनिमल लिबरेशनच्या वतीने प्राणी हक्क, अहिंसा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शहरात १७ किलोमीटरच्या ‘सत्याग्रह मार्च’चे आयोजन करण्यात आले.
1 min read

Pune News : प्राणीमुक्ती, अहिंसा आणि वनस्पतीआधारित आहाराचा संदेश; १२० हून अधिक नागरिकांचा सहभाग

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पुणे ॲनिमल लिबरेशनच्या वतीने प्राणी हक्क, अहिंसा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शहरात १७ किलोमीटरच्या ‘सत्याग्रह मार्च’चे आयोजन करण्यात आले. कोथरूड येथील गांधी भवनपासून येरवड्यातील आगाखान पॅलेसपर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत १२० हून अधिक तरुण, नागरिक आणि प्राणीप्रेमींनी सहभाग घेतला. https://maharashtramirror.com/ Pune News
प्राण्यांवरील अत्याचार रोखणे, डेअरी उद्योगातील प्राण्यांच्या परिस्थितीबाबत जनजागृती करणे आणि वनस्पतीआधारित आहाराचा पर्याय नागरिकांसमोर मांडणे, हा या पदयात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune News
गांधी भवन येथून सुरू झालेली पदयात्रा कर्वे पुतळा, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रस्ता, पुणे महानगरपालिका मुख्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे येरवडा येथील आगाखान पॅलेसपर्यंत पोहोचली. पांढऱ्या वेशभूषेतील कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने मार्च करत अहिंसेचा संदेश दिला.
खडू-कलेतून जनजागृती
पदयात्रेदरम्यान शहरातील विविध चौकांमध्ये खडू-कलेच्या माध्यमातून प्राण्यांच्या वेदना, डेअरी उद्योगातील परिस्थिती आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाशी संबंधित चित्रे साकारण्यात आली. या माध्यमातून प्राणी हक्क आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भारतीय संविधानातील कलम ५१-अ (g) अंतर्गत सर्व सजीव प्राण्यांबद्दल दयाभाव बाळगण्याच्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याकडेही आयोजकांनी लक्ष वेधले. आधुनिक पशुपालन आणि डेअरी उद्योगातील प्राण्यांच्या परिस्थितीबाबत जनजागृती करताना वनस्पतीआधारित आहाराचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रशासनाकडे विविध मागण्या
प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी, जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समिती (SPCA) सक्रिय करणे, शासकीय खरेदीमध्ये वनस्पतीआधारित आहाराला प्रोत्साहन देणे आणि अस्वच्छ तसेच बेकायदेशीर मांसविक्री केंद्रांवर कारवाई करणे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
प्राण्यांबद्दलची संवेदनशीलता केवळ वैयक्तिक आहाराच्या निवडीपुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि प्रशासकीय धोरणांमध्येही प्रतिबिंबित व्हावी, अशी भूमिका प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी मांडली. प्राणी हक्क, पर्यावरण संरक्षण आणि मानवी आरोग्य हे परस्परांशी जोडलेले विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आगाखान पॅलेस येथे सांगता
१७ किलोमीटरची पदयात्रा आगाखान पॅलेस येथे पोहोचल्यानंतर कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सहभागी कार्यकर्त्यांनी सामूहिक अहिंसा संकल्प केला आणि सत्याग्रह मार्चची सांगता झाली.


