सरकारी दरात पुणेकरांना मिळणार कॅन्सरवर उपचार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अत्याधुनिक कर्करोग केंद्राचे लोकार्पण
2 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अत्याधुनिक कर्करोग केंद्राचे लोकार्पण
सुमारे १६५ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यासाठी महापालिकेने १४ कोटी रुपयांची जमीन उपलब्ध करून दिली आहे
निलेश राऊत
पुणे: कर्करोगाच्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. पुणे महापालिकेने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.१७) व्यक्त केला.

पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून बाणेर येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, उपमहापौर परशुराम वाडेकर, तसेच महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम उपस्थित होते.
राज्यात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात आणि त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे. महापालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास महापालिकेचे पदाधिकारी, आपुलकी फाउंडेशनचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, भाजप व राष्ट्रवादी कांग्रेसचे नगरसेवक, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाची पाहणी करून विविध उपचार विभाग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, तसेच रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली.
सरकारी दरात होणार कॅन्सर उपचार
बाणेर येथे महापालिकेच्या सुमारे एक एकर जागेत हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. सुमारे १५० खाटांची क्षमता असलेल्या पीपीपी मॉडेल कर्करोग सेंटरमध्ये पुणेकरांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरात कॅन्सर उपचार मिळणार आहेत. जवळपास १६५ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यासाठी महापालिकेने १४ कोटी रुपयांची जमीन उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित गुंतवणूक, व्यवस्थापन आणि कर्मचारी खर्चाची जबाबदारी संबंधित संस्था म्हणजेच आपुलकी मेडिकल केअर सेंटर पार पाडणार आहे.
कॅन्सर रुग्णालयाच्या नावावरून वाद; टीका होताच फलक गायब
महापालिकेने खासगी सहभाग तत्त्वावर (पीपीपी) बाणेर येथे उभारलेल्या कर्करोग (कॅन्सर) रुग्णालयाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. या रुग्णालयाला स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याचा फलक शनिवारी (दि.१६) समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्याने अखेर हा नामफलक हटवला.
कर्करोगावर एकाच छताखाली सर्वसमावेशक उपचार मिळावेत या उद्देशाने पुणे महापालिकेने बाणेर येथे खासगी सहभाग तत्त्वावरील (पीपीपी) कर्करोग रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि.१७) झाले. पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्यातर्फे हा संयुक्त प्रकल्प चालविला जाणार आहे.
मात्र, रुग्णालयाच्या उद्घाटनापूर्वीच त्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे वडील प्रा. यशवंत भिमाले कॅन्सर रुग्णालय असा नामफलक लावल्याचा फोटो शनिवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यानंतर पुणेकरांनी समाजमाध्यमांवर रोष व्यक्त केला. सॅलेसबेरी पार्क येथील नगरसेवक भिमाले यांचे अथवा त्यांच्या परिवाराचे बाणेर येथील रुग्णालयासाठी योगदान काय? असा सवाल उपस्थित केला. या रुग्णालयाला कोणत्याही व्यक्तीचे नाव देण्याऐवजी पुणे महापालिकेचे नाव देण्यात यावे. वादग्रस्त नामफलक हटवावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
अखेर रविवारी उद्घाटनापूर्वी भिमाले यांच्या नावाचा फलक हटवून वादावर पडदा टाकला.


