Pune News : पुणेकरांना ऑक्टोबर हीटपासून दिलासा; शहरात पावसाची संततधार, आणखी दोन ते तीन दिवस सरींचा अंदाज
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
1 min read

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारपासून शहरात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी सकाळीही शहरातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला. पुढील दोन ते तीन दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
ऑक्टोबर महिन्यात पुणेकरांना ऑक्टोबर हीटचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने शहरात उकाडा प्रचंड वाढला होता. दिवसा उन्हाचा तडाखा आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिक हैराण झाले होते. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणेही अनेकांना त्रासदायक ठरत होते. मात्र, रविवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची ऑक्टोबर हीटपासून काही प्रमाणात सुटका झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'मुरासू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वातावरणातील बदलांना चालना मिळाली असून, शहराच्या परिसरात बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. शनिवारी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यानंतर रविवारी पहाटेपासून शहरातील विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली.
रविवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. सोमवारी सकाळीही अनेक भागांत पावसाने जोर धरल्याने रस्ते ओले झाले आणि वातावरणात गारवा पसरला. या बदलामुळे सकाळी फिरायला जाणारे नागरिक, नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागांत हलका, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एकूणच, ऑक्टोबर महिन्यातील कडक उन्हानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला असून, शहरातील वातावरण पुन्हा एकदा आल्हाददायक झाले आहे.


