Pune News : परदेशातील आप्तजनांसाठी दिवाळी होणार गोड; पुणे टपाल विभागाचा अनोखा उपक्रम!
Pune News :पुणे : दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो खमंग फराळ.
1 min read

Pune News :पुणे : दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो खमंग फराळ. तथापि, नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या आपल्या लाडक्या नातेवाइकांना हा घरचा फराळ कसा पाठवायचा, हा मोठा प्रश्न असतो. पुणेकरांची हीच अडचण ओळखून पुणे टपाल विभागाने यंदाच्या दिवाळीत सोयीस्कर उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे आता सहजपणे परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत दिवाळीचा फराळ आणि भेटवस्तूंची पार्सल पाठवता येणार आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
या उपक्रमांतर्गत पोस्टमन थेट घरी येऊन फराळाचे पार्सल विनामूल्य घेऊन जातील. तसेच, शहरातील जी.पी.ओ., मुख्य पोस्ट ऑफिस, चिंचवड ईस्ट, मार्केट यार्ड आणि पर्वती यांसारख्या मोठ्या पोस्ट ऑफिसमध्ये फराळ सुरक्षित राहण्यासाठी अत्याधुनिक साहित्याद्वारे नाममात्र किमतीत पॅकिंगची उत्तम सोय केली आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी पुणे टपाल विभागाने तब्बल २१ हजार किलो फराळ परदेशात वेळेत पोहोचविला होता. या वर्षीही हाच उत्साह कायम ठेवण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी पुणे विमानतळ परिसरातील कार्गो टर्मिनल येथे ‘एपीटीएमओ पुणे’ नवीन बुकिंग काऊंटरचे उद्घाटन पोस्टमास्टर जनरल प्रीती अग्रवाल आणि डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेसचे अभिजीत बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे काऊंटर सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत (रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही) सुरू राहणार आहे. मोफत पिकअप सेवेसाठी आणि अधिक माहितीसाठी ७०२८००७२२३ किंवा ८४२१३७२३१७ या क्रमांकांवर सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत संपर्क साधता येईल.


