Pune Police News : भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या ११३ घरमालक, पीजी चालकांवर कारवाई
पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या नागरिकांची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालक आणि पीजी चालकांविरोधात पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
2 min read

Pune Police News : पुणे पोलिसांची विशेष मोहीम; भाडेकरारासह पोलिसांना माहिती देणे आवश्यक, मोहीम आणखी तीव्र होणार

पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या नागरिकांची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालक आणि पीजी चालकांविरोधात पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ११३ घरमालक आणि पीजी चालकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार कारवाई करण्यात आली आहे. शहराची सार्वजनिक सुरक्षा अबाधित राखण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. Pune Police News
शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने राज्याच्या विविध जिल्ह्यांसह परराज्यांतून मोठ्या संख्येने नागरिक पुण्यात येतात. यातील अनेक जण सोसायट्या, बैठ्या चाळी तसेच इतर ठिकाणी भाडेतत्त्वावर, पीजी किंवा कॉट बेसिसवर राहतात. अशा भाडेकरूंसोबत कायदेशीर भाडेकरार करणे आवश्यक असतानाही काही घरमालक आणि पीजी चालकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. (tenant information) (Pune)

पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सह पोलिस आयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. विशेष शाखेच्या परिमंडळ एक ते सातमधील अधिकारी व अंमलदारांनी संबंधित पोलिस ठाण्यांच्या मदतीने भाड्याने दिलेल्या घरांची आणि सदनिकांची तपासणी केली. भाडेकरार केला आहे का आणि भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला देण्यात आली आहे का, याची पडताळणी करण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भाडेकरार न करता अथवा भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्याला न देता घर भाड्याने दिल्याचे आढळल्यास संबंधित घरमालकावर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ च्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी ऑनलाइन भरलेल्या ई-लीव्ह अँड लायसन्सची माहिती आयजीआरच्या ‘आय-सारिता’ प्रणालीद्वारे सीसीटीएनएसमध्ये उपलब्ध होते. तसेच पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावरील सिटिझन पोर्टलच्या माध्यमातूनही घरमालकांना भाडेकरू किंवा पेइंग गेस्टची माहिती ऑनलाइन देता येते. Pune Police News
कोथरूड, डेक्कन, आंबेगाव, नऱ्हे, चतुःशृंगी, खडकी, लोणीकंद, लोणी काळभोरसह शहरातील विविध भागांत ही कारवाई करण्यात आली आहे. घरमालक आणि पीजी चालकांनी भाडेकरूंची माहिती न चुकता संबंधित पोलिस ठाण्याला द्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. ही विशेष मोहीम यापुढे आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी स्पष्ट केले आहे.


