Pune News : पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता परीक्षा रद्द करा
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या बहुचर्चित भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.
5 min read

Pune News : 'एक्स' (X) वरील व्हायरल फोटोने फोडले बिंग; कागदपत्र पडताळणी प्रक्रियेला स्थगिती
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या बहुचर्चित भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी तीन उमेदवार, परीक्षा केंद्रावरील दोन कर्मचारी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे.ब्लर्ब हा घोटाळा मोठा असून यात मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करत फेरपरीक्षा न घेतल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांसह राजकीय नेत्यांकडून देण्यात आला आहेhttps://maharashtramirror.com/ Pune News
या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, हा घोटाळा मोठा असून यात मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करत फेरपरीक्षा न घेतल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांसह राजकीय नेत्यांकडून देण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
नामांकित संस्थेमार्फत ऑनलाइन स्वरूपात घेतली परीक्षा
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त किशोरी प्रदीप तोडमल यांनी दिलेल्या तक्रारीवरून २८ ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन' (IBPS) या नामांकित संस्थेमार्फत ऑनलाइन स्वरूपात ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा २२ एप्रिल, २३ एप्रिल आणि २९ एप्रिल २०२६ रोजी पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नांदेड आणि कोल्हापूर येथील विविध परीक्षा केंद्रांवर अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पार पडल्या होत्या.https://maharashtramirror.com/ Pune News
कागदपत्र पडताळणी प्रक्रिया तातडीने स्थगित
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या परीक्षेतील पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी ८ जून रोजी महापालिकेला सादर करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच ९ जून रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू असताना, समाजमाध्यमांवरून एक तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली. 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर परीक्षेतील एका प्रश्नाचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोची आणि इतर तांत्रिक माहितीची अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी केली असता, हा प्रश्न २३ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सत्रातील परीक्षेतील असल्याचे निष्पन्न झाले. या धक्कादायक खुलाशानंतर, महापालिका प्रशासनाने कोणतीही जोखीम न पत्करता पुढील कागदपत्र पडताळणी प्रक्रिया तातडीने स्थगित केली. https://maharashtramirror.com/ Pune News
तीन उमेदवार एफआयआरमध्ये मुख्य आरोपी
या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशीअंती गजानन कैलास पाचे, शिवशंकर गंगाधरराव शेळगावे आणि विष्णूकांत कर्बाजी वाघमारे या तीन उमेदवारांना एफआयआरमध्ये मुख्य आरोपी म्हणून नामनिर्देशित केले आहे. तसेच, परीक्षा केंद्रावर नियुक्त असलेले दोन कर्मचारी - इलेक्ट्रिशियन योगेश राजू राठोड आणि वॉशरूम सुविधेचा कर्मचारी विकास गायकवाड - यांच्यावरही कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, सोशल मीडियावर प्रश्नाचा फोटो प्रसारित करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सायबर पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर सुरू आहे.
कनिष्ठ अभियंता परीक्षा रद्द करण्यासाठी राजकीय पक्ष आक्रमक
महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही उमेदवारांना नियुक्त्या देण्याची घाई का, असा सवाल करीत ही भरती प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश ‘एनएसयूआय’चे सरचिटणीस कृष्णा साठे यांनी केली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र, उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची; तसेच पारदर्शकपणे फेरपरीक्षा घेण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे. अशीच मागणी सामाजिक कार्यकर्ते रविराज काळे यांनीही केली आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी या संदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. 'विद्यार्थ्यांनीच परीक्षेतील गैरप्रकारांविषयीचे पुरावे दिल्यानंतर पालिकेने तीन विद्यार्थ्यांवर कारवाई केली; परंतु हा गैरप्रकार फक्त तीन विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित होता का ? इतर किती विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला? याची चौकशी न करता इतर उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची घाई कशासाठी,' असे प्रश्न भानगिरे यांनी उपस्थित केले आहेत. ही परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. या गैरप्रकारांमध्ये पालिका प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निष्पक्ष चौकशी न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशाराही भानगिरे यांनी दिला आहे
सीसीटीव्ही आणि डेटा विश्लेषणातून धक्कादायक माहिती
तक्रारीनुसार, जेव्हा संशय बळावला तेव्हा अधिकाऱ्यांनी परीक्षेचा डेटा, उमेदवारांच्या प्रतिसादाचे नमुने आणि परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. यामध्ये या तीन संशयित उमेदवारांच्या कामगिरीमध्ये अत्यंत असामान्य बाबी आढळून आल्या. त्यांनी मिळवलेले गुण, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी घेतलेला अत्यंत कमी वेळ आणि उत्तरे देण्याची त्यांची पद्धत इतर सर्वसामान्य उमेदवारांपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी होती. यातील एका उमेदवाराने परीक्षेदरम्यान एकापेक्षा जास्त वेळा वॉशरूमला जाण्यासाठी परीक्षा कक्ष सोडल्याचे सीसीटीव्हीमध्ये निष्पन्न झाले आहे.
उत्तरे मिळवण्यासाठी किंवा प्रसारित करण्यासाठी नेमक्या कोणत्या हायटेक पद्धतीचा वापर करण्यात आला, हे अद्याप निश्चितपणे निष्पन्न झालेले नाही, असे एफआयआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, या गैरप्रकारामध्ये परीक्षेतील मजकूर छुपा कॅमेरा किंवा मोबाईलद्वारे कॅप्चर करणे, तो प्रसारित करणे आणि बाहेरील व्यक्तींकडून उत्तरे मिळवणे यांचा समावेश असण्याची दाट शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किंवा परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेत अनधिकृत प्रवेश मिळवल्याची शक्यताही नाकारता येत नाही. हे सर्व दावे सध्या प्राथमिक आरोपांच्या स्वरूपात असून पोलीस यावर सखोल तपास करत आहेत.
या प्रकरणी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळ आणि इतर विनिर्दिष्ट परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा, १९८२ च्या संबंधित तरतुदी आणि राज्य शासनाने नुकत्याच लागू केलेल्या 'महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) कायदा, २०२४' च्या कलम ३ आणि ११ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार हा अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो.
या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत असून, लवकरच या रॅकेटमधील इतर मोठ्या माशांना गळाला लावले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पेपरफुटी नाही, केवळ तीन उमेदवारांचा गैरप्रकार: आयुक्त नवलकिशोर राम
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत कोणतीही पेपरफुटी झालेली नसून, परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहे. हा गैरप्रकार केवळ वैयक्तिक स्वरूपाचा होता आणि सिस्टीमच्या स्वतःच्या तांत्रिक विश्लेषणातून तो वेळीच उघडकीस आला. एकाही उमेदवाराला नियुक्ती देण्यापूर्वीच प्रशासनाने यावर कडक कारवाई केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त राम यांनी सांगितले की, उपलब्ध पुरावे आणि डेटा लॉग्सनुसार पेपर फुटल्याचा किंवा परीक्षा प्रक्रियेत छेडछाड झाल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. एखाद्या उमेदवाराने परीक्षा केंद्रावर वैयक्तिकरीत्या केलेला गैरप्रकार आणि पेपरफुटी या दोन पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
निर्दोष उमेदवारांना नियुक्ती देणार
अशा प्रकरणांमध्ये दोषी आणि निर्दोष उमेदवारांची विभागणी करण्याच्या तत्त्वाला न्यायालयीन निकालांमध्येही सातत्याने मान्यता देण्यात आली आहे. या प्रकरणात ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेमुळे गैरप्रकारात सामील असलेल्या उमेदवारांची अचूक ओळख पटवणे आणि त्यांना वगळणे महापालिकेला शक्य झाले. त्यामुळे, ज्या उमेदवारांवर कोणताही ठपका नाही आणि जे निर्दोष आहेत, त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया महापालिकेने पुढे सुरू ठेवली आहे.
केवळ तीन उमेदवारांनी गैरप्रकार केला म्हणून वर्षांनुवर्षे मेहनत करून प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या इतर सर्व उमेदवारांना त्याची शिक्षा देणे अन्यायकारक ठरेल. मोजक्या लोकांच्या चुकीमुळे नियम पाळून गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या बहुसंख्य उमेदवारांवर अन्याय होऊ नये, अशी महापालिकेची ठाम भूमिका असल्याचे आयुक्तांनी अधोरेखित केले. संपूर्ण पारदर्शकता जपण्याच्या उद्देशाने, महापालिकेने परीक्षा घेणाऱ्या 'आयबीपीएस'चा सविस्तर अहवाल पीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. यामुळे सर्व संबंधितांना आणि उमेदवारांना या निष्कर्षांची स्वतः पडताळणी करता येईल.
या गैरप्रकाराप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून याचा सखोल आणि स्वतंत्र तपास केला जात आहे. तपासाच्या प्रक्रियेनुसार सर्व संबंधित माहिती कायद्याच्या चौकटीत उघड केली जाईल. असे असतानाही ज्यांना महापालिकेच्या निर्णयाबाबत आक्षेप आहे, ते राज्य सरकार किंवा माननीय न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहेत, असेही नवलकिशोर राम यांनी यावेळी स्पष्ट केले.


