Skip to content

Pune News : पुणेकरांना ऑक्टोबर हीटपासून दिलासा; तापमानात घट, शहरात गारवा

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती झाल्याने राज्यातील हवामानात बदल झाला असून, पुणे शहरात बाष्पयुक्त वाऱ्यांचे आगमन झाले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पुणेकरांना ऑक्टोबर हीटपासून दिलासा; तापमानात घट, शहरात गारवा
पुणेकरांना ऑक्टोबर हीटपासून दिलासा; तापमानात घट, शहरात गारवा

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती झाल्याने राज्यातील हवामानात बदल झाला असून, पुणे शहरात बाष्पयुक्त वाऱ्यांचे आगमन झाले आहे. या बदलामुळे सोमवारपासून शहराच्या तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. शहरातील कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच तीव्र उकाड्याने झाली होती. महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जाणवणाऱ्या ऑक्टोबर हीटमुळे पुणेकर हैराण झाले होते. शहरातील कमाल तापमान थेट ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने दिवसभर उन्हाचा चटका आणि उष्णतेचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, सोमवारपासून हवामानात बदल झाल्याने नागरिकांना या उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिनाभरापासून पुणे शहरातील तापमानात वाढ झाल्याने सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळांत उष्णतेची तीव्रता जाणवत होती. घराबाहेर पडतानाच नव्हे, तर घरातही उकाड्याचा सामना करावा लागत असल्याने पंखे, कूलर आणि वातानुकूलित यंत्रांशिवाय राहणे कठीण झाले होते.

दरम्यान, शहरात थंड वारे वाहू लागल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे. तापमानातील घसरण आणि हवामानातील या बदलामुळे पुणेकरांना ऑक्टोबर हीटच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला असून, शहरातील वातावरण सध्या अधिक आल्हाददायक झाले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share