PUNE NEWS : हडपसर ते लोणी महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर
वीजपुरवठा खंडित, सिग्नल यंत्रणा बंद
2 min read

वीजपुरवठा खंडित, सिग्नल यंत्रणा बंद
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणि त्यानंतर खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे हडपसर परिसरातील वाहतूक व्यवस्था बुधवारी पूर्णपणे कोलमडली. प्रमुख चौकांमधील वाहतूक सिग्नल बंद पडल्याने हडपसर ते लोणी दरम्यानच्या पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हजारो नागरिकांना तासन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.PUNE NEWS

पहिल्याच पावसात यंत्रणा कोलमडली
सकाळी आठच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा थेट परिणाम वाहतूक सिग्नल यंत्रणेवर झाला. गाडीतळ चौक, मांजरी फाटा, शेवाळेवाडी, मगरपट्टा चौक, वैदुवाडी चौक, रविदर्शन चौक तसेच उड्डाणपूल परिसरातील सर्व सिग्नल बंद पडल्याने वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले.PUNE NEWS
पावसाच्या पहिल्याच मोठ्या सरींनी प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा उघड केल्या असून, तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास येत्या पावसाळ्यात पुणेकरांना अशाच वाहतूक नरकयातना सहन कराव्या लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.PUNE NEWS
सकाळी दहानंतर पाऊस थांबला असला तरी वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. परिणामी सिग्नल यंत्रणा बंदच राहिली आणि वाहनांची संख्या वाढत गेल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर बनली. कार्यालयीन वेळ असल्याने नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसला. अनेक नागरिकांना नियोजित वेळेपेक्षा एक ते दोन तास उशिरा गंतव्यस्थानी पोहोचावे लागले.PUNE NEWS
वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक त्या प्रमाणात पोलिस कर्मचारी चौकांमध्ये उपलब्ध नसल्याने परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली. सिग्नल बंद असल्याने वाहनचालकांनी स्वतःच्या सोयीने वाहने पुढे घुसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चौकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत पोहोचल्या होत्या.
दरम्यान, पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आणि वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.PUNE NEWS
आपत्कालीन यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या आपत्कालीन नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. काही तासांच्या पावसामुळे जर संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प होत असेल, तर प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा नेमक्या काय करतात?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.PUNE NEWS
नागरिकांनी महत्त्वाच्या चौकांमध्ये सौरऊर्जेवर किंवा बॅटरी बॅकअपवर चालणारे सिग्नल बसविणे, वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने वाहतूक पोलिस तैनात करणे तसेच पावसाळ्यापूर्वी रस्ते व जलनिस्सारण व्यवस्थेची प्रभावी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी केली आहे.
PUNE NEWS


