Skip to content

PUNE NEWS: अखेर क्षेत्रीय कार्यालयेच करणार रस्ते दुरुस्ती

ऑक्टोबरनंतर पथ विभागाकडे जबाबदारी

PG
Prashik Ghaste

1 min read

PUNE NEWS: अखेर क्षेत्रीय कार्यालयेच करणार रस्ते दुरुस्ती

ऑक्टोबरनंतर पथ विभागाकडे जबाबदारी

निलेश राऊत
पुणे: शहरातील रस्ते खोदकामानंतर दुरुस्तीची जबाबदारी अखेर क्षेत्रीय कार्यालयांकडेच ठेवण्यात आली आहे. तर महापालिकेच्या ड्रेनेज तसेच पाणी पुरवठा विभागासाठी खोदकाम करण्यात आल्यानंतर त्याची दुरुस्ती मात्र पथ विभाग करणार आहे. तूर्तास या दोन्ही विभागांच्या कामानंतर दुरुस्ती सध्या ठेकेदारच करीत आहेत. तर, महापालिकेकडून सर्वच विभागांची खोदाई बंद करण्यात आली आहे.PUNE NEWS

त्यामुळे तूर्तास हे काम क्षेत्रीय कार्यालयच करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा प्रस्तावही पथ विभागाने पालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.

पालिकेकडून इंटरनेट, गॅस, वीज, जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार यांसह विविध सेवा वाहिन्यांसाठी खासगी आणि शासकीय संस्थांना रस्ते खोदकामाची परवानगी दिली जाते. यासाठी संबंधित कंपन्यांकडून पुनर्स्थापना शुल्क आकारले जाते. यापूर्वी खोदलेले रस्ते बुजविणे, रिसरफेसिंगची जबाबदारी पथ विभागाकडे होती.PUNE NEWS

मात्र, यंदा क्षेत्रीय कार्यालयांच्या सक्षमतेसाठी ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी साडेतीन कोटींचा निधीही दिला असून, त्यांनीही निविदा काढलेल्या आहेत, असे असतानाच आयुक्तांनी शहरात दुरुस्तीच्या कामांची पाहणी केल्यानंतर या पुढे दुरुस्तीची कामे पथ विभागाने करावी, असे लेखी आदेश काढले.

निधी नसल्याने पथ विभागाची माघार
आयुक्तांनी पथ विभागाने दुरुस्ती करण्याचे आदेश काढल्यानंतर पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना निधी दिलेला असल्याने मुख्य खात्यास काम करता येणार नसल्याचे सांगत हात वर केले होते. तर आयुक्तांच्या आदेशानंतर क्षेत्रीय कार्यालयानेही कामे बंद केली होती. त्यामुळे पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असला तरी कामे सुरू झालेली नव्हती. त्यावर आता तोडगा काढत, शहरातील सध्या खोदाई झालेली दुरुस्ती क्षेत्रीय कार्यालयेच करणार, केवळ पाणी पुरवठा आणि ड्रेनेज विभागाच्या कामासाठी केलेल्या खोदाईनंतरची दुरुस्ती पथ विभाग करेल. १ ऑक्टोबरनंतर दुरुस्तीसाठी पथ विभागास निधी देणार आहेत.

PUNE NEWS

Share