Pune News : नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, देवीच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे.
1 min read

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, देवीच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे. उद्या, रविवारी (दि.११) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. पूजेचे साहित्य, फुले, सजावटीच्या वस्तू, कपडे आणि दागिन्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
घटस्थापनेसाठी लागणारी मातीची मटकी, टोपल्या, सात प्रकारचे धान्य, माती, दोरा, फुले, ओढणी आणि कापसाचे वस्त्र अशा विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. पाच ते २५ रुपयांपर्यंत पूजेच्या साहित्याच्या वस्तू उपलब्ध असल्याने ग्राहकांकडून खरेदीला पसंती दिली जात आहे. मातीच्या मटक्यांना कुंदन टिकल्या आणि आकर्षक सजावटीमुळे विशेष मागणी आहे. उपवासासाठी फळांसह रताळ्यांचीही बाजारात आवक झाली आहे.
दरम्यान, शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून देवीच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तींचे आगमन झाले असून, गरबा आणि दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिर परिसर आणि रस्त्यांवरील आकर्षक रोषणाईमुळे शहरात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
“नवरात्रोत्सवासाठी लागणारे पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात आले आहे. यंदा बाजारात विविध प्रकारच्या वस्तू आणि आकर्षक सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे खरेदी करताना उत्साह वाटत असून, नवरात्रोत्सवाची तयारीही वेळेत पूर्ण होत आहे.” अमृता झांबरे, महिला ग्राहक


