Pune News : पाणी उधळपट्टी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा?
Pune News : महत्वाचे मुद्दे *या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी अधिकृत आदेश केले जारी *पालिका प्रशासनाचे सर्व विभागांना कडक अंमलबजावणीचे निर्देश *सर्व सार्वजनिक व खासगी वाहने धुण्याची केंद्रे पूर्णपणे बंद; नियमाचे उल्लंघन केल्यास दहा हजार दंड *काँक्रीट प्रकल्पांसाठी पिण्याच्या पाण
3 min read

Pune News : पिण्याच्या पाण्याची नासाडी रोखण्यासाठी अत्यंत कडक पावले; सलग तीन वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा मनपाचा इशारा
Pune News : महत्वाचे मुद्दे
*या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी अधिकृत आदेश केले जारी
*पालिका प्रशासनाचे सर्व विभागांना कडक अंमलबजावणीचे निर्देश
*सर्व सार्वजनिक व खासगी वाहने धुण्याची केंद्रे पूर्णपणे बंद; नियमाचे उल्लंघन केल्यास दहा हजार दंड
*काँक्रीट प्रकल्पांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर पूर्णपणे बंदीhttps://maharashtramirror.com/Pune News
Pune News : पुणे: पुणे शहरात संभाव्य पाणीटंचाईचे सावट लक्षात घेता, पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याची नासाडी रोखण्यासाठी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. यापुढे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर १०,००० रुपयांपर्यंतचा दंडात्मक बडगा उभारण्यात येणार असून, सलग तीन वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महापालिकेने दिला आहे.https://maharashtramirror.com/Pune News
या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत. शहरवासीयांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे आणि मौल्यवान जलसंपत्तीचा अपव्यय टळावा, यासाठी पालिका प्रशासनाने सर्व विभागांना कडक अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.https://maharashtramirror.com/Pune News
वॉशिंग सेंटर आणि स्विमिंग पूलवर निर्बंध
पाणीकपातीच्या काळात शहरातील सर्व सार्वजनिक व खासगी वाहने धुण्याची केंद्रे पूर्णपणे बंद ठेवावी लागतील. या आदेशाचे उल्लंघन करून सेंटर चालू ठेवल्यास १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.
मात्र, ज्या वॉशिंग सेंटर्सकडे स्वतःची खाजगी बोअरवेल किंवा विहीर आहे, त्यांना आठवड्यातून केवळ तीन दिवस (रविवार, मंगळवार आणि गुरुवार) व्यवसाय करण्याची सवलत देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सार्वजनिक व खासगी स्विमिंग पूल तसेच खासगी बगीच्यांसाठी पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियम मोडल्यास १०,००० रुपये दंड आकारला जाईल.
बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले पाणी अनिवार्य
शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामांवरही पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. इमारत बांधकाम, रस्ते विकास आणि रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्पांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व कंत्राटदारांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून मिळणारे प्रक्रिया केलेले पाणी किंवा बोअरवेलचे पाणी वापरणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांना १०,००० रुपयांचा दंड केला जाईल. तसेच, गरज पडल्यास संबंधित बांधकामाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले जातील.
अनधिकृत नळ जोडण्यांवर तात्काळ हातोडा
शहरात चालणाऱ्या अनधिकृत पाणी वापरावर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनाने विशेष पथके तयार केली आहेत. अनधिकृत नळ जोडणी आढळल्यास ती तात्काळ तोडली जाईल आणि संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला ५,००० रुपये दंड आकारला जाईल. वारंवार असा प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. घरगुती किंवा व्यावसायिक इमारतींमधील पाण्याचा हौद अथवा टाकी ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावर वाहिल्यास १,००० रुपये दंड आकारला जाईल. शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमधून पाणी गळती होत असल्यास टँकर चालकाला १०,००० रुपयांचा दंड ठोठावला जाईल.
गृहनिर्माण संस्थांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना
खासगी गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याचा पुनर्वापर वाढवण्यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
बंद पडलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्वरित सुरू करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना नोटिसा बजावण्यात येतील.
फ्लशिंग आणि बागकामासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
टाक्या ओव्हरफ्लो होऊन होणारी नासाडी रोखण्यासाठी 'ऑटोमॅटिक फ्लोट व्हॉल्व्ह' बसवण्याबाबत जनजागृती केली जाईल.
दरमहा १५ तारखेला सादर करावा लागणार अहवाल
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पाणीपुरवठा विभाग, क्षेत्रीय कार्यालये, उद्यान विभाग, इमारत विकास विभाग आणि रस्ते विभागाला जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने एका 'नोडल अधिकाऱ्याची' नियुक्ती करणे बंधनकारक आहे.
हे अधिकारी दरमहा १५ तारखेला आपल्या भागातील कारवाईचा सविस्तर 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' पाणीपुरवठा विभागाकडे सादर करतील. तसेच, या मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


