Skip to content

Pune News : पुणे महापालिकेची मोठी कारवाई: शहरातील १३ अनधिकृत पीजी-हॉस्टेल अन् ७ भंगार गोदामांना टाळे

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील अनधिकृत पीजी हॉस्टेल तसेच सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या भंगार गोदामांविरोधात पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन दलाने तीव्र कारवाईचा बडगा उगारला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

पुणे महापालिकेची मोठी कारवाई: शहरातील १३ अनधिकृत पीजी-हॉस्टेल अन् ७ भंगार गोदामांना टाळे
पुणे महापालिकेची मोठी कारवाई: शहरातील १३ अनधिकृत पीजी-हॉस्टेल अन् ७ भंगार गोदामांना टाळे

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील अनधिकृत पीजी हॉस्टेल तसेच सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या भंगार गोदामांविरोधात पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन दलाने तीव्र कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या थेट आदेशानुसार सलग तिसऱ्या दिवशी राबवण्यात आलेल्या या धडक तपासणी मोहिमेत वडगाव बुद्रुक, नऱ्हे आणि धायरी परिसरातील १३ अनधिकृत पीजी-हॉस्टेल आणि सात भंगार गोदामे तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने, अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर आणि बांधकाम विभागाचे अभियंता विश्वजित वाघमोडे यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई पार पाडली. तपासणी दरम्यान बहुतांश ठिकाणी अग्निसुरक्षेच्या मूलभूत नियमांची उघडपणे पायमल्ली झाल्याचे समोर आले. अनेक पीजी आणि हॉस्टेलमध्ये आणीबाणीच्या वेळी लागणारी अग्निशामक यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि योग्य विद्युत व्यवस्था यांचा पूर्णपणे अभाव असल्याचे आढळले. सुरक्षेच्या या गंभीर त्रुटींमुळे भविष्यात एखादी मोठी आपत्कालीन दुर्घटना घडल्यास प्रचंड जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला होता.

रहिवासी भागात ज्वलनशील वस्तूंचा बेकायदेशीर साठा

तपासणीदरम्यान रहिवासी भागातील पत्र्याच्या शेडमध्ये प्लास्टिक, स्टील, लोखंड, कागद आणि पोती यांसारख्या अत्यंत ज्वलनशील वस्तूंचा प्रचंड साठा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी केवळ भंगार साठवणूकच नव्हे, तर त्यावर अनधिकृतपणे प्रक्रिया करण्याचे कामही सुरू असल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या आस्थापनांनी कोणत्याही कायदेशीर परवानग्या घेतलेल्या नव्हत्या. बीडीपी झोनमधील जागांचा गैरवापर, अरुंद रस्ते, ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, पालिका करांची थकबाकी तसेच अधिकृत वीजपुरवठ्याबाबत आवश्यक असलेल्या परवानग्यांकडे पूर्णपणे काणाडोळा करण्यात आला होता. अनेक ठिकाणी जागामालकांनी संपूर्ण इमारती किंवा जागा भाडेतत्त्वावर दिल्या होत्या, मात्र तेथे प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचा व्यवसाय चालवला जात आहे, यावर मालकांचे कोणतेही नियंत्रण वा लक्ष नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दोषींवर थेट गुन्हे दाखल व आस्थापना सील करण्याचे आदेश

या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि विनापरवाना व्यवसाय चालवणाऱ्या आस्थापनांवर थेट गुन्हे दाखल करून त्या तत्काळ सील करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. आयुक्तांच्या या आक्रमक भूमिकेमुळे येत्या काळात अनधिकृत हॉस्टेल्स व भंगार गोदामांवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि इतर वैधानिक परवानग्यांचा अभाव आढळल्यास संबंधित जागामालक व व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. अग्निसुरक्षेच्या नियमांचे आणि महापालिकेच्या परवानग्यांचे पालन न करणाऱ्या सर्व आस्थापनांची कसून तपासणी केली जाईल आणि ही मोहीम अशीच पुढे चालू राहील, असा स्पष्ट इशारा अग्निशमन दलाकडून देण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share