Skip to content

Pune News : पुणे महापालिकेच्या अपघात विमा योजनेतून कर्मचाऱ्याला ६.२५ लाखांची मदत

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या 'समूह वैयक्तिक अपघात विमा योजने'अंतर्गत आणखी एका कर्मचाऱ्याला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पुणे महापालिकेच्या अपघात विमा योजनेतून कर्मचाऱ्याला ६.२५ लाखांची मदत
पुणे महापालिकेच्या अपघात विमा योजनेतून कर्मचाऱ्याला ६.२५ लाखांची मदत

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या 'समूह वैयक्तिक अपघात विमा योजने'अंतर्गत आणखी एका कर्मचाऱ्याला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. आरोग्य कार्यालयातील लिपिक टंकलेखक हरिश्चंद्र श्रीरंग गोरे यांना अपघाती दुखापतीपोटी ६ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या हस्ते महापालिका भवनात हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News

अपघातातील अपंगत्वापोटी भरपाई


आरोग्य विभागातील लिपिक हरिश्चंद्र गोरे यांचा २४ नोव्हेंबर २०२५ रोजी अपघात झाला होता. या दुर्दैवी घटनेत त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे दोन पेरे तुटले होते. या अपघाती दुखापतीमुळे उद्भवलेल्या शारीरिक नुकसानाची दखल घेत महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाने विमा योजनेच्या नियमानुसार ६ लाख २५ हजार रुपयांची मदत मंजूर केली. बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर, कामगार कल्याण विभागाचे खातेप्रमुख व मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मदतनिधी गोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर पुणे महापालिकेत २०१६ पासून कायमस्वरूपातील सेवकांसाठी ही समूह वैयक्तिक अपघात विमा योजना राबवली जात आहे. सेवेत असताना अथवा इतर वेळी घडणाऱ्या अपघातांमध्ये कर्मचाऱ्यांना अपंगत्व आल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी ही योजना आधारवड ठरत आहे.
कामगार कल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत एकूण २६ अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कायदेशीर वारसांना २ कोटी ८० लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
ऐन गरजेच्या वेळी महापालिकेच्या विमा योजनेमुळे मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करत हरिश्चंद्र गोरे यांनी प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. महापालिकेचे अधिकारी आणि कामगार कल्याण विभागाच्या तत्परतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होत असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share