Skip to content

Pune News : पुणे मार्केट यार्डात रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याचा आरोप; व्यक्तीचा मृत्यू, आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Pune News :पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याचा गंभीर बाबा समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

पुणे मार्केट यार्डात रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याचा आरोप; व्यक्तीचा मृत्यू, आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पुणे मार्केट यार्डात रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याचा आरोप; व्यक्तीचा मृत्यू, आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Pune News :गुलटेकडी मार्केट यार्डात नेमके काय घडले? व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपत्कालीन सेवेवर प्रश्न

Pune News :पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याचा गंभीर बाबा समोर आली आहे. बाजारातील जय शरद गजानन मंदिरासमोर सोमवारी (ता. १९) सकाळी पोटात तीव्र वेदना होत असल्याने एक व्यक्ती बसून होती. तिथेच एक डॉक्टर उपलब्ध होते. त्यांनी त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यास सांगितले. मात्र, वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही आणि संबंधित व्यक्तीचा त्याच ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती आहे . या घटनेमुळे बाजार समितीच्या आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मार्केट यार्डातील जय शरद गजानन मंदिरात आरती सुरू होती. त्याचवेळी एक व्यक्ती पोटात तीव्र वेदना होत असल्याचे सांगत मंदिरासमोर बसली होती. संबंधित व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने तेथे असलेल्या डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे, मार्केट यार्डात आपत्कालीन परिस्थितीसाठी २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्ष गरजेच्या वेळी ही रुग्णवाहिका उपलब्ध का झाली नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. बाजार समितीच्या आवारात दररोज हजारो शेतकरी, व्यापारी, हमाल, कामगार आणि नागरिकांची वर्दळ असते. अशा गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय मदतीची व्यवस्था कार्यक्षम असणे अत्यावश्यक आहे. मात्र, या घटनेने संबंधित यंत्रणेच्या सज्जतेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख आणि मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अधिकाऱ्यांकडून सुरक्षा रक्षकांकडे बोट?
या घटनेची माहिती बाजार समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी सुरक्षा रक्षकांना कळविण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२४ तासांच्या रुग्णवाहिका सेवेचा दावा कागदावरच?
बाजार समितीच्या आवारात चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध असल्यास घटनेच्या वेळी ती नेमकी कुठे होती? तिच्यावर चालक आणि आवश्यक कर्मचारी नियुक्त होते का? रुग्णवाहिका बोलावण्याचा निरोप मिळाल्यानंतर किती वेळात ती घटनास्थळी पोहोचली? या सर्व बाबींची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः आपत्कालीन व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली, हेही स्पष्ट होणे आवश्यक आहे.

सदर ची व्यक्ती बेवारस आहे. सकाळी १० वाजता आरती चालू असतानी त्याठिकाणी पोट दुखते म्हणून खाली बसले. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आले आहे. रुग्णवाहिका देखील आली आहे.

नितीन चौरे, विभाग प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share