Skip to content

Pune News : सत्ताधारी नगरसेवकांचे अधिकारी ऐकत नाहीत

Pune News : पुणे: पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला (भाजप) स्पष्ट बहुमत आणि एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही प्रभागातील विकासकामे रखडल्यामुळे आणि प्रशासकीय अधिकारी जुमानत नसल्यामुळे खुद्द सत्ताधारी नगरसेवकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता.

VK
Vikrant Kulkarni

3 min read

सत्ताधारी नगरसेवकांचे अधिकारी ऐकत नाहीत भाजप नगरसेवकांच्या नाराजीनंतर मुरलीधर मोहोळ यांची धाव, १२६ नगरसेवकांशी साधला संवाद
सत्ताधारी नगरसेवकांचे अधिकारी ऐकत नाहीत भाजप नगरसेवकांच्या नाराजीनंतर मुरलीधर मोहोळ यांची धाव, १२६ नगरसेवकांशी साधला संवाद

Pune News : भाजप नगरसेवकांच्या नाराजीनंतर मुरलीधर मोहोळ यांची धाव, १२६ नगरसेवकांशी साधला संवाद

धनश्री ओतारी

Pune News : पुणे: पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला (भाजप) स्पष्ट बहुमत आणि एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही प्रभागातील विकासकामे रखडल्यामुळे आणि प्रशासकीय अधिकारी जुमानत नसल्यामुळे खुद्द सत्ताधारी नगरसेवकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. ‘आपलीच सत्ता असताना अधिकाऱ्यांची मनमानी का चालते?’ असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांसमोरच आपला संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत घेतलेल्या विशेष बैठकीत तब्बल १२६ भाजप नगरसेवकांशी सविस्तर संवाद साधत पक्षांतर्गत धुसफूस शमवण्याचा आणि प्रशासनावर पुन्हा पकड निर्माण करण्याचा विडा उचलला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

प्रशासनाची मुजोरी


निवडून येऊन सहा-सात महिने उलटले तरी नागरिकांना सांगता येतील अशी ठोस कामे मार्गी लागत नसल्याची खदखद नगरसेवकांनी या बैठकीत उघडपणे व्यक्त केली. महापालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी उद्धटपणे वागतात, शहर अभियंत्यासारख्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दहा-दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते आणि ठेकेदारांची जुनीच मक्तेदारी अद्यापही कायम आहे, अशा गंभीर तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वतःच्याच पक्षाच्या नगरसेवकांचे माईक बंद केले जातात आणि प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला. ‘आम्ही सत्तेत बसलोय की प्रशासनाला पाठीशी घालायला?’ असा थेट सवाल करत नगरसेवकांनी काही अधिकाऱ्यांच्या डोक्यावरील राजकीय ‘हात’ ताबडतोब काढून टाकण्याची मागणी केली.https://maharashtramirror.com/ pune news

पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव


महापालिकेत महापौर, सभागृहनेता आणि स्थायी समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भाजपकडे असताना प्रशासनावर अपेक्षित अंकुश का राहत नाही, हा प्रश्न या बैठकीमुळे ऐरणीवर आला. नगरसेवकांच्या या नाराजीची गंभीर दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिकाऱ्यांनाही घरचा आहेर दिला. पक्षातील तिन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी सातत्याने सुसंवाद ठेवावा आणि परस्पर समन्वयाने कामकाज चालवावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. नगरसेवकांनी प्रभागातील निधी आणि अधिकाऱ्यांच्या तक्रारींपुरते राजकारण न करता संपूर्ण शहराचा विचार करावा आणि आत्मपरीक्षण करून कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.https://maharashtramirror.com/ pune news

स्थानिक पातळीवर डिजिटल माध्यम आणि जनसंपर्क अधिक मजबूत करा


पुणेकरांनी भाजपवर विश्वास ठेवून सत्ता दिली असली, तरी ‘सर्वाधिक निधी मिळाला म्हणजे पुढील निवडणुकीत पुन्हा निवडून येण्याची हमी मिळाली,’ असे समजण्याचे कारण नाही, असा सूचक इशारा मोहोळ यांनी दिला. विरोधकांच्या हालचाली आता वाढू लागल्या असून, विविध विरोधी शक्ती एकत्र येऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यासाठी नगरसेवकांनी एक भक्कम टीम तयार करावी, असे त्यांनी सुचवले. २०१४ नंतर भाजपने सोशल मीडियाचा जसा प्रभावी वापर केला, त्याच धर्तीवर आता स्थानिक पातळीवरही डिजिटल माध्यम आणि जनसंपर्क अधिक मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

मुख्यमंत्र्यांच्या विशेष सूचनेनंतर धोरणात्मक पाऊल


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सूचनेनुसार पार पडलेल्या या मॅरेथॉन बैठकीचे मुख्य उद्दिष्ट पक्षांतर्गत दरी मिटवणे हे होते. महापालिकेच्या दैनंदिन कारभारात कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रशासकीय पातळीवरील लालफितीचा कारभार संपुष्टात यावा, यासाठी वरिष्ठ पातळीवरून आता कडक पावले उचलली जात आहेत. अधिकाऱ्यांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील आणि पक्षांतर्गत किंवा पदाधिकाऱ्यांच्या पातळीवरील प्रश्न बैठकांद्वारे सोडवले जातील, असा विश्वास मोहोळ यांनी दिला आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सर्व लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून एकाच सुरात पुढे जाण्याचे मोठे संकेत या घडामोडीतून मिळाले आहेत.

*केंद्रीय राज्यमंत्री यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत घेतली विशेष बैठक
*पक्षांतर्गत धुसफूस शमवण्याचा आणि प्रशासनावर पुन्हा पकड निर्माण करण्याचा उचलला विडा
*नागरिकांना सांगता येतील अशी ठोस कामे मार्गी लागत नसल्याने खदखद
*वरिष्ठ अधिकारी उद्धटपणे वागतात, शहर अभियंत्यासारख्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दहा-दहा दिवस प्रतीक्षा
*ठेकेदारांची जुनीच मक्तेदारी अद्यापही कायम


"पुणेकरांनी भाजपवर विश्वास ठेवून सत्ता दिली असली, तरी ‘सर्वाधिक निधी मिळाला म्हणजे पुढील निवडणुकीत पुन्हा निवडून येण्याची हमी मिळाली,’ असे समजण्याचे कारण नाही, असा सूचक इशारा मोहोळ यांनी दिला. विरोधकांच्या हालचाली आता वाढू लागल्या असून, विविध विरोधी शक्ती एकत्र येऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यासाठी नगरसेवकांनी एक भक्कम टीम तयार करावी." -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

Share