वडगाव शेरीत घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे नागरिक चिंतेत
1 min read

भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे नागरिक चिंतेत
पुणे: वडगाव शेरी परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, एका ४० वर्षीय महिलेचे कुलूपबंद घर फोडून अज्ञात चोरट्याने १ लाख ८७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या वेळेत ही घटना घडली. भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका ४० वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(१) आणि ३३१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. यावेळी नामदेवनगर (गल्ली क्र. ३) येथील त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचा लोखंडी कडी-कोयंडा चोरट्याने उचकटला. घरात प्रवेश करून चोरट्याने किचनमधील कपाटाची झडती घेतली. कपाटात ठेवलेले ५ हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटा पसार झाला.
रात्री फिर्यादी घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने चंदननगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


