Thane Crime : ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या; कुटुंबीयांचा जुन्या वादातून हत्येचा आरोप
Thane Crime : ठाणे: ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
2 min read

Thane Crime : ठाणे: ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमानगर परिसरातील त्यांच्या कार्यालयातच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पूर्णेकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.https://maharashtramirror.com/ Thane News
ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास काही जण प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात हल्ला करण्याच्या उद्देशानं गेले होते. त्यांनी पूर्णेकर यांच्यावर हल्ला केला आणि गोळीबार केला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात पाच संशयित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यापैकी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक पोलीस आणि क्राइम ब्रांचकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. https://maharashtramirror.com/ Thane News
CCTV फुटेज आधारे शोध सुरू
हल्ल्यापूर्वी दोन संशयित दुचाकीवरून पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेनं जात असल्याचं CCTV फुटेजमध्ये दिसून आलं आहे. दोघांनीही चेहऱ्यावर रुमाल बांधल्याचं या फुटेजमध्ये दिसत आहे. या CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांकडून इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमही दाखल झाली होती.
दरम्यान, या हत्येनंतर पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. जुन्या वादातून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम प्रदीप पूर्णेकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "CCTV फुटेजमध्ये स्पष्टच दिसतंय की कोण आलं आणि काय केलं. जोपर्यंत माझ्या वडिलांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह इथून हलवणार नाही."
तर प्रदीप पूर्णेकर यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनीही हत्येपूर्वीपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "गणपतीपासून हे सर्व सुरू होतं. ते रेकी करत होते. बाळूला विश्वास ठेवू नको, असं सांगितलं होतं."
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर मनोरमानगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच, परिसरातील तीन प्राथमिक शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आलं.
राजकीय भूमिकेमुळे हत्या झाली का?
दरम्यान, पूर्णेकर यांच्या अलीकडील राजकीय आणि सामाजिक हालचालींचीही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. मानपाडा, आझादनगर आणि गणेशनगर परिसरातील नागरिकांच्या एका प्रश्नासाठी ते आंदोलन करणार होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नव्हती. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती.
त्यामुळे या आंदोलनाचा आणि प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा काही संबंध आहे का, हत्येमागचं नेमकं कारण काय आणि या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. CCTV फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


