मावळात अंमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार
६२ ग्रॅम 'एमडी’सह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
1 min read

६२ ग्रॅम 'एमडी’सह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे: मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून ६२.११ ग्रॅम ‘एमडी’ (मॅफेड्रोन) या घातक अंमली पदार्थासह १८ लाख रुपये किमतीची स्कोर्पिओ गाडी आणि महागडे मोबाईल फोन, असा एकूण २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी अजय ऊर्फ गुरु अनिल शिंदे (वय २६, रा. कामशेत) आणि सार्थक विष्णू ढमाले (वय २०, रा. कामशेत) या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मैदानात लावला होता सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ५) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कामशेत ते पवननगर रस्त्यावरील चिखलसे गावच्या हद्दीत असलेल्या परफेक्ट कंपनीजवळील मोकळ्या मैदानात काही तरुण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिथे सापळा रचला. यावेळी एका काळ्या रंगाच्या ‘महिंद्रा स्कोर्पिओ निओ’ (क्रमांक MH 14 MQ 8019) गाडीतून आलेल्या या दोन तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
६ लाख २० हजारांचे ‘एमडी’ जप्त
पोलिसांनी गाडीची आणि आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाची पावडर आढळली. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर वजन केले असता, ६२.११ ग्रॅम वजनाचे ‘एमडी’ (मॅफेड्रोन) असल्याचे स्पष्ट झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे ६ लाख २० हजार रुपये (१० हजार रुपये प्रति ग्रॅम) आहे.
२५ लाखांचा ऐवज हस्तगत
अंमली पदार्थांसोबतच पोलिसांनी १८ लाख रुपये किमतीची स्कोर्पिओ गाडी, ६० हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलक्सी S24 अल्ट्रा आणि ४० हजार रुपयांचा सॅमसंग गॅलक्सी S24 असे दोन महागडे मोबाईल फोन जप्त केले आहेत. असा एकूण २५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कैलास बन्सीलाल लबडे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या तस्करीचे जाळे कोठपर्यंत पसरले आहे, याचा शोध घेत आहेत.


