Pune News : नवरात्रोत्सवासाठी ‘पीएमपीएमएल’ची विशेष पर्यटन बससेवा; ५०० रुपयांत शक्तीपीठांचे दर्शन
Pune news पुणे, महाराष्ट्र मिरर ः नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.
1 min read

Pune news पुणे, महाराष्ट्र मिरर ः नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कडून भाविक आणि पर्यटकांसाठी वातानुकूलित ‘स्मार्ट इलेक्ट्रिक’ पर्यटन बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि इतर दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार या बसेस चालविल्या जातात.https://maharashtramirror.com/ Pune News
या विशेष उपक्रमांतर्गत देवींच्या शक्तीस्थळांसाठी मार्ग क्र. १३ (१) आणि मार्ग क्र. १३ (२) या दोन प्रमुख सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
मार्ग क्र. १३ (१): पुणे स्टेशनवरून सकाळी ८:३० वाजता सुटणारी ही बस तळजाई माता मंदिर, पद्मावती मंदिर, कोंढणपूरची पद्मावती माता, पुरंदर येथील तुकाई देवी (शिवरी) व यमाई माता (कोडीत) अशा प्रमुख मंदिरांचे दर्शन घडवून सायंकाळी ७:०० वाजता पुणे स्टेशनला परत येईल.
मार्ग क्र. १३ (२): सकाळी ८:३० वाजता पुणे स्टेशनवरून सुटून चतुःश्रृंगी मंदिर, सारसबागेतील महालक्ष्मी मंदिर, तांबडी जोगेश्वरी, पिंपरी कॅम्पमधील वैष्णवी माता मंदिर आणि भवानी पेठेतील भवानी माता मंदिराचे दर्शन घडवत सायंकाळी ७:०० वाजता प्रवास पूर्ण होईल.
या पर्यटन बससेवेचे तिकीट दर प्रति प्रवासी ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर, मनपा भवन, भोसरी आणि निगडी या पास केंद्रांवर बुकिंग उपलब्ध आहे. अधिक माहिती व तिकीट बुकिंगसाठी समन्वयक नितीन गुरव (मो. ९८५०५०१८६२) यांच्याशी संपर्क साधता येईल. भाविकांच्या मागणीनुसार पर्यटन बस क्र. ५ मध्ये धायरेश्वर मंदिर व नांदेड गावातील जाधव वाडा आणि बस क्र. १२ मध्ये ‘श्री क्षेत्र पांडेश्वर’ शिवमंदिराचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. नागरिक, पर्यटक व भाविकांनी या माफक दरातील आरामदायी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलने केले आहे.


