Skip to content

pmpml:पीएमपीएमएलच्या महिला वाहकाचा प्रामाणिकपणा; ५,२०० रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे प्रवाशाला परत

बस प्रवासादरम्यान सापडलेले पॉकेट केले सुखरूप परत; स्वप्ना दराडे यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

महिला वाहकाचा प्रामाणिकपणा
महिला वाहकाचा प्रामाणिकपणा

pmpml:पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) महिला वाहकाने प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुकास्पद उदाहरण घालून दिले आहे. बसमध्ये प्रवासादरम्यान सापडलेले पॉकेट आणि त्यातील महत्त्वाची कागदपत्रे तसेच ५ हजार २०० रुपयांची रोख रक्कम संबंधित प्रवाशाला सुखरूप परत करून महिला वाहकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्वप्ना अमोल दराडे असे या महिला वाहकाचे नाव आहे.

२६ नोव्हेंबर रोजी शेवाळेवाडी आगाराच्या मार्ग क्रमांक २०३-७ (शेवाळेवाडी ते पुणे स्टेशन) या बसवर स्वप्ना दराडे सकाळच्या पाळीत कर्तव्य बजावत होत्या. दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास फातिमानगर येथे बसमध्ये एका प्रवाशाचे पॉकेट त्यांना आढळून आले. या पॉकेटमध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि ५ हजार २०० रुपये रोख होते.

दराडे यांनी कोणताही विलंब न करता हे पॉकेट शेवाळेवाडी आगारात जमा केले. पॉकेटमधील कागदपत्रांची तपासणी केली असता त्यामध्ये प्रवाशाचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यानंतर त्यांनी संबंधित प्रवासी दादू श्यामराव लव्हे यांच्याशी संपर्क साधून त्यांना आगारात बोलावले.

आगार व्यवस्थापक विलास बबन मते, क्लार्क विशाल ढिले, मुख्यालय प्रमुख करीम तांबोळी, संगणक विभागातील माधव सुंकेवार आणि महिला वाहक स्वप्ना दराडे यांच्या उपस्थितीत प्रवाशाला त्याचे पॉकेट, सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि संपूर्ण ५ हजार २०० रुपयांची रोख रक्कम परत करण्यात आली.

आपले हरवलेले साहित्य सुखरूप परत मिळाल्याने दादू लव्हे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाचे आभार मानले. तसेच स्वप्ना दराडे यांच्या प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे विशेष कौतुक केले. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे प्रवाशांप्रती असलेली जबाबदारी आणि विश्वासार्हतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror