Skip to content

PMC Health News : महिलांसाठीच्या शंभर स्वच्छतागृहांची घोषणा कागदावरच

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : शहरात गणेशोत्सवापूर्वी शंभर महिला स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केली होती.

VZ
Vidula Zagade

1 min read

PMC Health News : महिलांसाठीच्या शंभर स्वच्छतागृहांची घोषणा कागदावरच

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : शहरात गणेशोत्सवापूर्वी शंभर महिला स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केली होती. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात योग्य ती आर्थिक तरतूदही केली. मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि अद्यापही सुरू न झालेली निविदा प्रक्रिया यामुळे यंदाच्या उत्सवातही महिलांची स्वच्छतागृहांअभावी मोठी कुचंबणा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेच्या या ढिसाळ कारभाराचा संताप व्यक्त होत आहे.PMC Health News

कामानिमित्त किंवा खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना पुणे शहरात नेहमीच पुरेशा आणि स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावाचा सामना करावा लागतो. हीच गंभीर समस्या सोडवण्यासाठी यंदा महापालिका अंदाजपत्रकात शंभर नवीन महिला स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात प्रशासकीय दिरंगाईमुळे ही घोषणा कागदावरच राहिली.गणेशोत्सवाच्या काळात भेट देण्यासाठी शहरात लाखो भाविक येतात. यामध्ये महिलांची संख्या मोठी असते.

शहरातील मध्यवर्ती आणि गर्दीच्या भागांमध्ये महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे नाहीत. स्वारगेट, पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर एसटी आणि पीएमपीएमएल बस स्थानक परिसरात महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. कसबा पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ आणि बुधवार पेठ या दाट वस्तीच्या आणि बाजारपेठेच्या भागातही महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. काही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे अस्तित्वात असली, तरी तिथे नियमित स्वच्छता होत नसल्याने महिलांमधून नाराजी व्यक्त करत आहे. PMC Health News

‘मोबाइल टॉयलेट’चा आधार

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अल्पना वरपे यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केले की, “शहरात नवीन शंभर स्वच्छतागृहांची तात्पुर्ती उभारणी गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणे तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे. मात्र, ज्या भागात भाविकांची प्रचंड गर्दी होते, त्या ठिकाणी पुरेशा संख्येने मोबाइल टॉयलेट उपलब्ध करून द्यावेत, यासाठी महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागाला तातडीने पत्र देण्यात येणार आहे.”

“शहरात महिलांसाठी प्रस्तावित असलेल्या शंभर स्वच्छतागृहांसाठी आवश्यक जागांची निश्चिती करण्यात आली आहे. या कामाचा निविदा प्रस्ताव पुढील आठवड्यात सादर केला जाईल. त्यानंतर महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मात्र, गणेशोत्सवापूर्वी महिलांसाठी ही कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उपलब्ध होऊ शकणार नाहीत.”

  • संतोष वारुळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका
  • PMC Health News

    Share