Pune Crime : पिंपरी - चिंचवडमध्ये विविध पोलिस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद
Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मंगळवारी (दि.१) सप्टेंबर रोजी विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
2 min read

Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मंगळवारी (दि.१) सप्टेंबर रोजी विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विविध गुन्ह्यांच्या घटना पुढीलप्रमाणे - लोढा बेलमोंडो, गहुंजे येथे किरकोळ भांडणातून फिर्यादी महिला प्रेरणा नारायण यांना पती वैभव प्रकाश, सासरे राजीव मेहतानी आणि सासू अनिता मेहतानी यांनी मारहाण केली. सासऱ्यांनी महिलेचा विनयभंग केला, तर पतीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पती, सासरे व सासूवर शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
रिक्षचालकास मारहाण
शास्त्रीनगर चौक, कासारवाडी येथे फिर्यादी सोहेल शेख हे रिक्षा स्वच्छ करत असताना आरोपी शाहबाज कुरेशी व त्याच्या तीन मित्रांनी त्यांना मारहाण केली. “तू रावणचा भाऊ आहेस का?” असे विचारून तोंडावर बुक्का मारत फिर्यादीच्या खिशातील २ हजार ८०० रुपये सकावून पळ काढला. याप्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune Crime
‘प्रो कॅन्डल स्टॉक’ कंपनीकडून ४० लाखांची फसवणूक
‘प्रो कँडल स्टॉक मास्टर ओ.पी.सी. प्रा. लि.’ या कंपनीद्वारे दररोज एक टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. आरोपी प्रमोद लुंगारे, बजरंग शेलार व मंगेश नल्ले यांनी तक्रारदाराचे १५ लाख ४९ हजार रुपये आणि इतर गुंतवणूकदारांचे मिळून एकूण ४० लाख ७४ हजार ९७१ रुपये हडप केले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune Crime
बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक
पीएमटी मशीन्स लि. ची जमीन व फ्लॅट्सच्या विक्रीबाबत बनावट ठराव आणि संमतीपत्र तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली. आरोपी मोनिका शहा, शशी पॉल लखवारा, अनिल गुप्ता व इतरांवर फसवणुकीचा संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
जेष्ठ महिलेची फसवणूक
ममता चौकाजवळ दोन अज्ञात महिलांनी गुणाबाई दबडे (वय ६५) यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मणी-मंगळसूत्र काढून घेतले आणि पिशवीत खोट्या मण्यांची पुडी ठेवून फसवणूक केली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
दहा लाखांना गंडा
रावेत बी.आर.टी. रोडवर आरोपी राजू प्रजापती व त्याच्या साथीदारांनी पितळाच्या माळेवर सोन्याचे पॉलिश करून ते अर्धा किलो सोने असल्याचे भासवत तुकाराम राठोड यांच्याकडून दहा लाख रुपये रोख स्वीकारून फसवणूक केली. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हिंजवडीत अपघातात एकाचा मृत्यू
माण येथील श्रीराम वॉशिंग सेंटरजवळ फॉर्च्युनर कारचालक महेश जाधव याने अचानक टर्न घेत दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार संतोष जाधव (वय ४५) गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई
म्हाळुंगे स्टेडियमजवळ बावधन पोलिसांनी नऊ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा टेम्पोतून घेऊन जाणारा आरोपी दिलीप यादव याला अटक केली. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याशिवाय, कासारवाडी आणि संत तुकारामनगर भागात बेकायदेशीरपणे कोयता बाळगणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.


