Skip to content

स्वारगेट परिसरात पादचारी महिलेचे दागिने लंपास

पीएमपीएल प्रवास आणि पायी चालताना गर्दीचा फायदा घेऊन पावणे चार लाखांची चोरी

PG
Prashik Ghaste

2 min read

स्वारगेट परिसरात पादचारी महिलेचे दागिने लंपास

पीएमपीएल प्रवास आणि पायी चालताना गर्दीचा फायदा घेऊन पावणे चार लाखांची चोरी

पुणे: पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या स्वारगेट परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करताना आणि रस्त्यावरून पायी चालताना महिला प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या भामट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे समोर आले आहे.

पीएमपीएम्एल बसमधून प्रवास करत असलेल्या एका ३८ वर्षीय महिलेची पर्स चोरट्याने अत्यंत शिताफीने उघडून आतील तब्बल ३ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. स्वारगेट येथील वसंत टॉकीज ते जेधे चौक आणि तेथून वेगा सेंटरच्या दरम्यान भरदिवसा हा धाडसी चोरीचा प्रकार घडला. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या साहाय्याने तपास सुरू केला आहे.

बस प्रवास आणि पायी चालताना घडली घटना
याबाबत मुंढवा येथील रहिवासी असलेल्या एका ३८ वर्षीय पीडित महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. ही घटना बुधवार (ता. २७) मे २०२६ रोजी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटे ते अकरा वाजून चाळीस मिनिटे या केवळ पंधरा मिनिटांच्या कालावधीत वसंत टॉकीज ते जेधे चौक दरम्यान चालणाऱ्या पीएमपीएम्एल बसमध्ये तसेच जेधे चौक ते वेगा सेंटर दरम्यानच्या पायी चालण्याच्या मार्गावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय फिर्यादी महिला कामानिमित्त स्वारगेट परिसरात आल्या होत्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी वसंत टॉकीज येथून जेधे चौकाकडे जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बस पकडली. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा गैरफायदा घेऊन पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्याने फिर्यादी महिलेच्या खांद्याला अडकवलेल्या पर्सची चेन शिताफीने उघडली. चोरट्याने पर्समधील ३ लाख ८० हजार रुपये किमतीचे मौल्यवान सोन्याचे दागिने चोरून नेले.

जेधे चौकात बसमधून उतरल्यानंतर फिर्यादी महिला वेगा सेंटरच्या दिशेने पायी चालत जात असताना, त्यांना आपली पर्स उघडी असल्याचे आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आजूबाजूला शोध घेतला मात्र गर्दीचा फायदा घेऊन चोरटा आधीच पसार झाला होता. त्यानंतर पीडित महिलेने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून गर्दीच्या ठिकाणी वावरणाऱ्या संशयित खिसेकापूंवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिरसट या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Share