Skip to content

पुणे-अक्कलकोट बसमध्ये प्रवाशाची लूट

भिगवण स्थानकावर मुंबईच्या महिलेचे सव्वा लाखांचे दागिने चोरीस

PG
Prashik Ghaste

1 min read

पुणे-अक्कलकोट बसमध्ये प्रवाशाची लूट

भिगवण स्थानकावर मुंबईच्या महिलेचे सव्वा लाखांचे दागिने चोरीस

पुणे: पुणे-अक्कलकोट या एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका मुंबईस्थित महिला प्रवाशाचे १ लाख ३९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले आहेत. ही घटना कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान भिगवण बसस्थानकावर घडली. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

सुनीता मोहन चव्हाण (वय ३७, रा. अवधूत नगर, दहिसर पूर्व, मुंबई) यांनी याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

बसच्या प्रवासात दागिन्यांवर डल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता चव्हाण आणि त्यांची मुलगी रविवारी (ता. २६) दुपारी तीनच्या सुमारास भिगवण येथे जाण्यासाठी पुणे-अक्कलकोट या एसटी बसने (ST Bus) प्रवास करत होत्या. कुरकुंभ ते भिगवण या दरम्यान बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. बस भिगवण स्थानकावर आली असता, गर्दीचा फायदा घेऊन कोणातरी अज्ञात चोरट्याने सुनीता यांच्या ताब्यातील पर्समधून सोन्याचे दागिने शिताफीने चोरले.
चोरीस गेलेला मुद्देमाल (एकूण १,३९,००० रुपये): १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस (किंमत १,००,००० रुपये), ४ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले आणि वेल (किंमत ३०,००० रुपये), १ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ (किंमत ६,००० रुपये), एक सोन्याचा मणी (किंमत ३,००० रुपये).

बसमध्ये असताना किंवा खाली उतरताना पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने भिगवण पोलीस ठाणे गाठून या चोरीची माहिती दिली. एसटी प्रवासात दागिने सांभाळण्याबाबत वारंवार सूचना दिल्या जात असूनही अशा घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये काळजी व्यक्त होत आहे. पोलीस हवालदार सूर्यवंशी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share