Jalana News : सध्याची मदत ही केवळ दिवाळीची भेट : पंकजा मुंडे ; पीक नुकसानभरपाई, विमा आणि केंद्राची मदत स्वतंत्रपणे देणार
Jalana News : जालना, प्रतिनिधी : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सध्या जाहीर केलेली मदत ही अंतिम मदत नसून केवळ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणारी अग्रिम रक्कम आहे.
1 min read

Jalana News : जालना, प्रतिनिधी : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सध्या जाहीर केलेली मदत ही अंतिम मदत नसून केवळ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणारी अग्रिम रक्कम आहे. पीक नुकसानीची मदत, पीक विम्याची रक्कम आणि केंद्र सरकारकडून मिळणारा दुष्काळ निवारण निधी या स्वतंत्र बाबी असून आगामी काळात शेतकऱ्यांना आणखी मदत मिळणार असल्याचे जालन्याच्या पालकमंत्री तथा दुष्काळ निवारण समितीच्या सदस्य पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. सरकारची सध्याची मदत तुटपुंजी असल्याच्या विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.https://maharashtramirror.com/ Jalana News
जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात चारा, पिण्याचे पाणी आणि अन्य उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “दुष्काळाची परिस्थिती गंभीर ते अतिगंभीर होत चालली आहे. त्यामुळे चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर सरकार डोळ्यात तेल घालून काम करत आहे. दर मंगळवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते आणि मुख्यमंत्री त्याचा आढावा घेतात,” असे मुंडे म्हणाल्या.
आगामी दिवसांत जमिनीतील आर्द्रता आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने चाऱ्याचे आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आधी चारा डेपो, गरज पडल्यास छावण्या
दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असल्याने चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाला सरकारने प्राधान्य दिल्याचे मुंडे यांनी सांगितले. सुरुवातीला गावोगावी चारा पोहोचवण्यासाठी चारा डेपो सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर गरजेनुसार गावपातळीवर व्यवस्था केली जाईल आणि परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास चारा छावण्यांचा पर्याय स्वीकारण्यात येईल. चारा छावण्या सुरू करण्याची वेळ आल्यास तेथे सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासह जनावरांचे जिओटॅगिंग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नुकसानीचा अहवाल केंद्राकडे जाणार
केंद्रीय पथकाने दुष्काळग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी केली असून पंचनाम्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. “केंद्रीय पथकाने कोरडी पडलेली धरणे आणि उद्ध्वस्त झालेली पिके प्रत्यक्ष पाहिली आहेत. राज्य सरकार आणि जालन्याची पालकमंत्री म्हणून मी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.


