Delhi News : भारतातील ३३ कोटी नागरिकांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका; हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको!
Delhi News :नवी दिल्ली : भारतात ऑस्टिओपोरोसिस अर्थात हाडांचा ठिसूळपणा ही गंभीर आरोग्यसमस्या बनत आहे.
2 min read

Delhi News :नवी दिल्ली : भारतात ऑस्टिओपोरोसिस अर्थात हाडांचा ठिसूळपणा ही गंभीर आरोग्यसमस्या बनत आहे. ऑस्टिओपोरोसिस सोसायटी ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार, देशातील सुमारे २२.९ टक्के नागरिकांना या आजाराचा धोका असून, ही संख्या ३३ कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. विशेषतः वयाची पन्नाशी ओलांडलेल्या महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. दर तीन महिलांपैकी एका महिलेला ऑस्टिओपोरोसिसचा त्रास असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/Delhi News
ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडांची घनता कमी होऊन ती ठिसूळ बनतात. त्यामुळे किरकोळ पडणे, धक्का लागणे किंवा अपघात होणे यामुळेही हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर (मेनोपॉज) या आजाराचा धोका अधिक असतो. या काळात शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण कमी झाल्याने हाडांची झीज वेगाने होऊ शकते. परिणामी महिलांच्या हालचालींवर मर्यादा येऊन दैनंदिन जीवनही प्रभावित होते.
फ्रॅक्चरमुळे उपचारांचा खर्च वाढतो
ऑस्टिओपोरोसिसमुळे होणाऱ्या फ्रॅक्चरचा आर्थिक परिणामही मोठा आहे. २०२६ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, भारतात उपचार घेत असलेल्या ऑस्टिओपोरोसिस रुग्णांमुळे निर्माण होणारा वार्षिक सामाजिक-आर्थिक बोजा सुमारे २२ हजार ७७३ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यामध्ये उपचार, रुग्णालयातील खर्च आणि फ्रॅक्चरशी संबंधित आर्थिक परिणामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांच्या उपचारांवर फ्रॅक्चर नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत कितीतरी अधिक खर्च होतो.
वेळीच निदान करण्यावर भर
या आजाराचे वेळीच निदान आणि प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडून हाडांच्या आरोग्याचे नियमित मूल्यमापन करण्याचा सल्ला दिला जात आहे. वय, शरीराची ठेवण, वैद्यकीय इतिहास आणि इतर जोखीम घटकांचा विचार करून हाडांच्या आरोग्याचे प्रगतीपत्रक तयार केल्यास संभाव्य रुग्णांची वेळीच ओळख पटवणे शक्य होईल.
ऑस्टिओपोरोसिस सोसायटी ऑफ इंडियाने वैद्यकीय तज्ज्ञांसाठी हाडांच्या आरोग्याचे प्रगतीपत्रक (बोन हेल्थ स्कोअरकार्ड) तयार करण्याचा पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून विविध वैद्यकीय शाखांतील डॉक्टरांना रुग्णांच्या हाडांच्या आरोग्याचे मूल्यमापन करणे आणि आवश्यकतेनुसार पुढील तपासण्या व उपचार सुचवणे अधिक सोपे होणार आहे.
महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज
वाढते वय, रजोनिवृत्ती, कॅल्शियम व जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव आणि काही वैद्यकीय समस्या यांमुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो. त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेसा कॅल्शियम व जीवनसत्त्व ‘ड’ आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाडांच्या घनतेची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.हाडे फ्रॅक्चर झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजाराचा धोका वेळीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाय करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.


