Skip to content

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! 36 लाखांच्या घरफोडीचा 24 तासांत छडा; 3 आरोपींना बेड्या

Navi Mumbai Police Latest News : कळंबोलीतील चोरीचे 30 तोळे सोने हस्तगत; तांत्रिक तपासाच्या जोरावर गुन्हे शाखेने डायघरमध्ये रचला सापळा

V
Vivek

1 min read

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! 36 लाखांच्या घरफोडीचा 24 तासांत छडा; 3 आरोपींना बेड्या

Navi Mumbai Police Latest News : कळंबोलीतील चोरीचे 30 तोळे सोने हस्तगत; तांत्रिक तपासाच्या जोरावर गुन्हे शाखेने डायघरमध्ये रचला सापळा

नवी मुंबई,कळंबोली :- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत गुन्हे शाखा कक्ष-2 ने अत्यंत कौशल्याने तपास करत कळंबोली येथील एका मोठ्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी 36 लाख रुपये किमतीचे 30 तोळे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले असून, कल्याण तालुक्यातील डायघर आणि पडले गाव परिसरातून तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. Navi Mumbai Police

9 मार्च 2026 रोजी संध्याकाळी कळंबोली, सेक्टर-16 येथील रुबी संतोष पात्रो यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 30 तोळे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला होता. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त सचिन गुंजाळ यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते.

गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. अवघ्या काही तासांतच आरोपींची माहिती मिळताच पोलिसांनी डायघर परिसरात सापळा रचला. या कारवाईत पवन रोहिदास जाधव (25 वय), सुमित रोहिदास जाधव (22 वय) आणि शिवाजी जगन राठोड (23 वय) या तिघांना शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना 13 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या टोळीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का, याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share